उस्तुरी-बोरसुरी शेतरस्त्याने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST2021-03-21T04:18:50+5:302021-03-21T04:18:50+5:30

उस्तुरी येथील वाक्सा शिवारातील जवळपास ६० ते ७० शेतकरी शेताकडे जाण्यासाठी उस्तुरी-बोरसुरी रस्त्याचा वापर करत होते. मात्र, रस्ता अरुंद ...

Usturi-Borsuri took a deep breath on the farm road | उस्तुरी-बोरसुरी शेतरस्त्याने घेतला मोकळा श्वास

उस्तुरी-बोरसुरी शेतरस्त्याने घेतला मोकळा श्वास

उस्तुरी येथील वाक्सा शिवारातील जवळपास ६० ते ७० शेतकरी शेताकडे जाण्यासाठी उस्तुरी-बोरसुरी रस्त्याचा वापर करत होते. मात्र, रस्ता अरुंद असल्याने, शेतातून धान्याची रास आणायचे असेल, तर शेतकऱ्यांच्या शेतातील पिके काढायची वाट पाहावी लागत हाेती. त्यातच पावसाळ्यात रस्त्यावर गुडघाभर चिखल होत असल्याने, गाई, बैल आणि म्हशींना शेतातच बांधावे लागत असे. शेतात जनावरांना चारा पाणी करण्यासाठी पावसाळ्यात पायातील वाहन हातात धरून गुडघाभर चिखलातून शेताकडे जावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त हाेते. शेताकडे जाण्यास रस्ता नसल्याने शिवारातील शेतकरी शेतात पाणी असूनही उसाची लागवड करत नव्हते. त्यामुळे उस्तुरी-बोरसुरी शेतरस्ता व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा प्रयत्न केले.

आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना रस्त्याअभावी होत असलेला त्रास पाहून स्थानिक आमदार निधीतून शेतरस्ते, पाणंदरस्ते आणि शिवरस्ते बनविण्यासाठी वेगळाच पॅटर्न राबविण्याचे काम आ.अभिमन्यू पवार यांनी हाती घेतले होते. त्यांनीही तत्काळ जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव यांना उस्तुरी येथे आणून सदरील रस्त्याचे भूमिपजन केले. गत अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची असलेली रस्त्याची मागणी पूर्ण होऊन जवळपास दीड किलोमीटर रस्त्याचे मातीकाम झाले आहे. पावसाळ्यात शिवारातील पाणी ओढ्याला आणण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नालाही घेण्यात आले आहे. एकूण १ लाख ५३ हजार खर्च करून बनविण्यात आलेल्या रस्त्याला आमदार निधीतून प्रतिकिमी ५० हजार मिळाले आहे. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या लोकवाट्यातून करण्यात आले आहे. पूर्वी ज्या रस्त्यावरून बैलगाडी जाणे मुश्कील होते. या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून, एकाच वेळी दोन बैलगाडी जातील, असा रस्ता बनविण्यात आला आहे. शेताकडे जाण्यासाठी रस्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या धान्याच्या राशी वेळेवर होणार असून, कारखान्याचे वाहन शेतात आणता येणार असल्याने, यंदा उसाची लागवडही माेठ्या प्रमाणावर हाेणार, असल्याचे बाेलले जात आहे. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. परिणाम, शिवारातील शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.

Web Title: Usturi-Borsuri took a deep breath on the farm road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.