उदगीरातील दाम्पत्याचा नदीपात्रात बुडून मृत्यू; कर्नाटकातील सावळी संगम येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 19:34 IST2021-07-05T19:33:59+5:302021-07-05T19:34:39+5:30
Drowning Case : मृत पती-पत्नीवर उदगीरातील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.

उदगीरातील दाम्पत्याचा नदीपात्रात बुडून मृत्यू; कर्नाटकातील सावळी संगम येथील घटना
उदगीर (जि. लातूर) : शहरातील लातूर रोडवरील शिवनगर भागातील एक दाम्पत्य सोमवारी पहाटे कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या कमालनगर तालुक्यातील सावळी संगम येथे दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, त्यांचा तेथील मांजरा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत पती-पत्नीवर उदगीरातील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंद्रकांत अमृत मुळे (५५) व राजश्री चंद्रकांत मुळे (५०, शिवनगर कॉलनी, लातूर रोड, उदगीर), असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास चंद्रकांत मुळे व राजश्री मुळे हे दाम्पत्य उदगीरपासून जवळ असलेल्या कर्नाटक राज्याच्या सीमेवरील कमालनगर तालुक्यातील सावळी संगम येथे दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, नदीपात्रात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. ही घटना समजल्यानंतर उदगीरातील त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी जाऊन त्यांचे मृतदेह उदगीर येथे आणले. दुपारी मलकापूर हद्दीतील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. दोघांचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत माहिती प्राप्त झाली नाही.