चाकूर : शहरातील मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने आगीत भस्मसात झाल्याची घटना सोमवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली. आगीत दोन्ही दुकानातील सामान आणि फर्निचर जळून सुमारे २६ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी एक युवक गंभीररीत्या भाजला असून त्याच्यावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत .
चाकूरमध्ये मुख्य बाजारपेठेत संभाजी लोंढे यांचे टेलरिंग मटेरीयलचे होलसेल दुकान आहे. त्यालगत उस्मान शेख यांचे इंटरनेट कॅफे आणि जॉबवर्कचे दुकान आहे. कोरोनामुळे रविवारी शहरात कडक निर्बंध लागू होते. संभाजी लोंढे यांचा मुलगा सुरज लोंढे (२५) हा दुकानाच्यावरील घरात झोपी गेला होता. सोमवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास सुरज लघूशंकेसाठी बाहेर आला. तेव्हा दुकानातून धूर निघत असल्याचे त्याला दिसले. दुकानाचे दार उघडताच आतून आगीच्या ज्वाला बाहेर पडल्या. यात होरपळून गेल्याने सुरज गंभीर जखमी झाला. त्याने लगेच नातेवाईकांना फोन करून आगीची माहिती दिली. नातेवाईकांनी लागलीच दुकानाकडे धाव घेतली. त्यांनी पहिल्यांदा सुरज याला स्थानिक दवाखान्यात दाखल केले. यानंतर त्याला अधिक उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही वेळातच दुकानातील सर्व साहित्य, फर्निचर भस्मसात झाले. आगीत संभाजी लोंढे यांच्या दुकानातील काचबटनच्या दोन मशीन, फर्निचर, टेलरिंगचे साहित्य जळून सुमारे २२ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर या दुकानालगत उस्मान शेख यांचा इंटरनेट कॅफे आणि जॉबवर्क सेंटर आहे. आगीत यातील ४ संगणक संच, ३ प्रिटर्स, साउंड सिस्टिम, फर्निचर जळून अंदाजे ४ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळी पोलिस निरिक्षक सोपान सिरसाट,पोहेकॉ हणमंत आरदवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.