भरधाव कारने दुचाकीवरील दोघांना फरफटत नेले, जागीच मृत्यू; अहमदपूरजवळ भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 12:10 IST2025-11-15T12:09:42+5:302025-11-15T12:10:25+5:30
पुण्यातून गावाकडे निघाले, पण टोलनाक्याजवळ भरधाव कारने चिरडले; नांदेड जिल्ह्यातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

भरधाव कारने दुचाकीवरील दोघांना फरफटत नेले, जागीच मृत्यू; अहमदपूरजवळ भीषण अपघात
अहमदपूर (जि. लातूर) : भरधाव वेगातील कारने दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील हडोळती येथील टोलनाक्याजवळ गुरुवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. मृत हे नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील आहेत.
माधव गुलाब लोहगावे (२४), संतोष संभाजी चिंतले (२०, दोघेही रा. कोकळेगाव, ता. नायगाव, जि. नांदेड) अशी मृतांची नावे आहेत. नायगाव तालुक्यातील कोकळेगाव येथील माधव लोहगावे व संतोष चिंतले हे पुण्यात नोकरी करीत होते. ते काही कामानिमित्ताने गावाकडे दुचाकी (एमएच २६, सीएन ९८२५) वरून निघाले होते. गुरुवारी रात्री ते हडोळतीनजीकच्या टोलनाक्याजवळ पोहोचले असता, नायगावहून भरधाव वेगात लातूरकडे निघालेल्या कार (एमएच २६, सीई ११९३)ने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा गंभीर होता की, कारने दुचाकीस्वारांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले होते. रस्त्यालगत असलेल्या ओढ्याच्या कठड्याला अडकून वाहन थांबले होते.
अपघात घडल्यानंतर कारचालक पसार झाल्याचे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सांगितले. घटनास्थळी रात्री उशिरा पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद अहमदपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विनोद मेत्रेवार हे अधिक तपास करीत आहेत.