प्रशासन गंभीर... अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी जिलेटीनद्वारे उडविल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 17:40 IST2022-03-05T17:38:54+5:302022-03-05T17:40:33+5:30
तहसील प्रशासनाची कारवाई : एक बोट, पोकलेन जप्त

प्रशासन गंभीर... अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी जिलेटीनद्वारे उडविल्या
निलंगा (जि. लातूर) : तालुक्यात नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारीवरून महसूल प्रशासनाने दोन बोटी जिलेटीनद्वारे उडविल्या, तर एक बोट व एक पोकलेन जप्त केले. ही कार्यवाही शुक्रवारी सायंकाळी माने जवळगा शिवारात करण्यात आली. तालुक्यातील तेरणा व मांजरा नद्यांच्या काठावरील बामणी, धानोरा, माने जवळगा, औराद शहाजानी, शिऊर, शिरोळ (वां.), गिरकचाळ, तुपडी येथे दिवसा व रात्री अवैधरित्या वाळूउपसा करण्यात येत आहे.
या अवैध वाळू उपशासंदर्भात सर्वसामान्याने तक्रार केल्यास धमकी दिली जात आहे. त्यामुळे कोणीही लेखी तक्रार करण्यास धजावत नाही. दरम्यान, वारंवार तक्रारी येऊ लागल्याने शुक्रवारी सायंकाळी तहसीलदार जतीन रहेमान, नायब तहसीलदार घनश्याम अडसूळ, मंडळ अधिकारी राजकुमार देशमुख, राजकुमार मिरजगावकर, तलाठी प्रवीण कस्तुरे, बालाजी भोसले, मुकेश सागावे, लिंबाळकर यांनी माने जवळगा शिवारात अचानक धाड टाकली. तेव्हा अवैधरित्या वाळूउपसा करणाऱ्या तीन बोटी व एक पोकलेन आढळून आले. प्रशासनाच्या कार्यवाहीमुळे वाळूउपसा करणाऱ्यांनी पलायन केले. दरम्यान, जिलेटीन लावून दोन बोटी नष्ट करण्यात आल्या. एक बोट आणि पोकलेन जप्त करण्यात आले आहे. ही बोट आणि पोकलेन कोणाचे आहेत, समजू शकले नाही. प्रशासनाने अज्ञात मालकावर पाच लाखांचा दंड ठोठावला आहे.
बामणी, धानोरा, गिरकचाळ, शिऊर, शिरोळ वां., तुपडी येथे पाणबुडी बोटीव्दारे वाळूउपसा केला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे नायब तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी सांगितले.