पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमास जाताना दुचाकीवरील तिघांना ट्रकने उडवले; एकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:35 IST2025-06-06T14:34:51+5:302025-06-06T14:35:05+5:30

परभणी - जहिराबाद महामार्गावरील मुगाव पाटीजवळची घटना

Three people on a bike were hit by a truck while going to a function at a guest's house; one died on the spot | पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमास जाताना दुचाकीवरील तिघांना ट्रकने उडवले; एकाचा जागीच मृत्यू

पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमास जाताना दुचाकीवरील तिघांना ट्रकने उडवले; एकाचा जागीच मृत्यू

निलंगा (जि. लातूर) : पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमास जाताना दुचाकीवरील तिघांना ट्रकने चिरडल्याची घटना परभणी - जहिराबाद महामार्गावरील मुगाव पाटीजवळ गुरुवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास घडली. यात मधुकर बाजीराव व्हरगळे (७०, रा. जाऊवाडी, ता. निलंगा) हे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

निलंगा तालुक्यातील जाऊवाडी येथील मधुकर बाजीराव व्हरगळे, दत्ता गिरीजप्पा डोरले व अशोक ग्यानदेव व्हरगळे हे तिघे निटूर येथील पाहुण्यांच्या घरी घरगुती कार्यक्रमासाठी गुरुवारी सकाळी दुचाकी (एमएच २४ एएन १८९८) वरुन निघाले होते. परभणी - जहिराबाद महामार्गावरील मुगाव पाटीजवळ आले असताना भरधाव वेगातील ट्रक (केए ३९ ए ००२७) ने जोराची धडक दिली. त्यात दुचाकी मधुकर व्हरगळे ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडले. या अपघातात दत्ता गिरीजप्पा डोरले (५५) व अशोक ग्यानदेव व्हरगळे (६५, रा. जाऊवाडी) हे गंभीर जखमी झाले. त्यातील एकास उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मधुकर व्हरगळे यांच्या पार्थिवाचे विच्छेदन निटूरच्या प्राथमिक उपकेंद्रात करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी शिरुर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. अधिक तपास शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे व निटूर चौकीचे बीट जमादार सुधीर शिंदे हे करीत आहेत.

परभणी - जहिराबाद महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
दळणवळण सुलभ व्हावे म्हणून परभणी - जहिराबाद महामार्ग बनविण्यात आला आहे. मात्र, हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पाच वर्षांत छोटे - मोठे अनेक अपघात झाले आहेत. त्यात दोनशेहून अधिक प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तसेच अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

रस्त्याच्या मधोमध भेगा
महामार्गाच्या मधोमध मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे दुचाकीचे टायर रुतून अनेक अपघात घडले आहेत. लातूरनजीकच्या बाभळगाव ते औराद शहाजनीपर्यंतच्या महामार्गावर शेकडो खड्डे पडले असून, बहुतांश ठिकाणी भेगा पडल्या आहेत. तसेच या मार्गावर ठिकठिकाणी सूचना फलकही नसल्याचे पाहावयास मिळत आहे. अपघात घडल्यानंतर नागरिक आक्रमक झाले की, संबंधितांकडून तात्पुरती डागडुजी केली जाते. त्यानंतर मात्र दुर्लक्ष करण्यात येते.

अधिकाऱ्यांकडून देखावा
एखादा अपघात घडल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी येऊन पाहणी करतात. तसेच संबंधित गुत्तेदारही दुरुस्ती केल्याचा दिखावा करतो. त्यानंतर मात्र, जैसे थे परिस्थिती राहते. या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी विविध पक्ष, संघटना व नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. मात्र, प्रशासनाने गांभीर्याने घेतले नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

टोलनाके काढून टाका
या महामार्गावरील पानचिंचोली येथे, तर निलंगा - लातूर मार्गावरील चलबुर्गा पाटीजवळ टोलनाका उभारण्यात आला आहे. मात्र, हा टोलनाका सुरुवातीपासून बंद आहे. मात्र, टोलनाक्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी, वाहनांना ये-जा करण्यास मोठी अडचण होत आहे. या ठिकाणी सातत्याने अपघात होत असतात. हा टोलनाका काढून वाहतुकीसाठी रस्ता खुला करावा, अशी मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे.

Web Title: Three people on a bike were hit by a truck while going to a function at a guest's house; one died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.