उदगीर / डिगोळ : उदगीर तालुक्यातील करडखेल येथे बुधवारी दुपारी कार व ट्रक यांच्यात समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात कारमधील तीन माजी सैनिकांचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर आहे. तिघांचे मृतदेह हेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, लातूर-उदगीर मुख्य रस्त्यावर असलेल्या करडखेल पाटी येथे बुधवारी दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास कार (क्रमांक एमएच २४ यू ०१६३)ने कर्नाटकातील बिदर येथून चाकूर तालुक्यातील सुगाव या त्यांच्या गावाकडे जात होते. यादरम्यान लातूरहून उदगीरकडे येणाऱ्या ट्रक (क्रमांक एपी ३९ टी ३६८६)ने कारला समोरासमोर जोरात धडक झाल्याने मोठा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर करडखेल पाटीवरील नागरिकांनी त्वरित घटनास्थळी येऊन जखमीला उदगीर येथील सामान्य रुग्णालयात पाठवले. या अपघातात कारमधील विठ्ठल येचवाड (वय ६२, रा. हरंगुळ, ता. लातूर), बाबुराव मोतीराव मेखले (वय ५९), यादव तुळशीराम काळे (वय ५८, दोघेही रा. सुगाव, ता. चाकूर) यांचा जागीच मृत्यू झाला. जहूर पठाण (वय ६०) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी लातूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती उदगीर सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पांडुरंग दोडके यांनी दिली आहे.
कार चक्काचूर झालीट्रक आणि कारचा समोरासमोर मोठा अपघात झाला. यात कार चक्काचूर झाली आहे. अपघातानंतर काही वेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघाताची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी संतोष शिंदे, राहुल नागरगोजे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.