माेबाइलसह चाेरट्याला अटक; स्थागुशाच्या पथकाची कारवाई
By राजकुमार जोंधळे | Updated: April 19, 2025 11:44 IST2025-04-19T11:44:05+5:302025-04-19T11:44:32+5:30
चाैकशीत तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, ही कारवाई लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

माेबाइलसह चाेरट्याला अटक; स्थागुशाच्या पथकाची कारवाई
राजकुमार जाेंधळे / लातूर : मोबाइल चाेरणाऱ्या एका आरोपीला २ लाख ८० हजारांच्या १६ मोबाइलसह शुक्रवारी अटक केली. चाैकशीत तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, ही कारवाई लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घर, दुकानातून मोबाइल चोरीच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, यातील आराेपींचा शाेध घेण्याचे आदेश पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले. त्यानुसार स्थागुशाचे पोनि. संजीवन मिरकले यांच्या पथकाने या गुन्ह्यांचा तपास केला जात हाेता. दरम्यान, खबऱ्याकडून या गुन्ह्याबाबत माहिती मिळाली. चोरीतील आराेपी हा चोरलेले मोबाइल विक्रीसाठी बाभळगाव चौक परिसरात येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीनंतर पाेलिसांनी तातडीने परिसरात सापळा लावला. यावेळी संशयिताला ताब्यात घेतले असात, त्याने महादेव दिलीप सन्मुखराव (वय २२, रा. राजीव नगर, बाभळगाव रोड, लातूर) असे नाव सांगितले. त्याच्या हातात असलेल्या पिशवीची तपासणी केली असता, त्यामध्ये चोरलेले १६ मोबाईल आढळून आले. त्याने हे मोबाईल विविध ठिकाणाहून चोरल्याचे कबूल केले.
ही कारवाई स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोउपनि. संजय भोसले, तुळशीराम बरुरे, योगेश गायकवाड, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, गणेश साठे, प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे यांच्या पथकाने केली.