डोळ्या देखत मित्राला बुडताना पाहिले, रंग खेळून तलावात उतरलेल्या तिघांची हतबलता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 17:55 IST2022-03-19T17:53:17+5:302022-03-19T17:55:25+5:30
रंग खेळून तलावात चार मित्र उतरले आणि अनर्थ घडला...

डोळ्या देखत मित्राला बुडताना पाहिले, रंग खेळून तलावात उतरलेल्या तिघांची हतबलता
अहमदपूर (जि. लातूर) : धुलीवंदनदिवशी रंग खेळून तलावाजवळ खाद्यपदार्थ शिजवून खाण्यासाठी गेलेल्या एका मित्राचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आनंदवाडी शिवारात शुक्रवारी घडली. याप्रकरणी अहमदपूर पोलीसांत आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.
अभिजित यल्लपा मोरे (२२, हमु. अहमदपूर) असे मयत युवकाचे नाव आहे. अहमदपुरातील उमर कॉलनीतील मोंढ्याच्या पाठीमागे होनवडज (ता. मुखेड, जि. नांदेड) येथील काही कुटुंबांची अस्थायी वस्ती आहे. या वस्तीतील अभिजित मोरे हा आपल्या इतर तीन मित्रांसोबत शुक्रवारी रंग खेळून सकाळी ११ वा. च्या सुमारास शहरानजिकच्या आनंदवाडी (काळेगाव) शिवारातील साठवण तलावाजवळ खाद्यपदार्थ बनविण्यासाठी गेला होता. खाद्यपदार्थ बनविण्यापूर्वी हातपाय धुवून यावे म्हणून प्रत्येक जण तलावात उतरले. तिघेजण तीन ते चार फूट अंतरावरपर्यंत जाऊन हातपाय धुवून परत आले. परंतु, अभिजित हा अधिक अंतरावर गेला. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने तलावातील खड्ड्यात बुडाला. त्यामुळे त्याने आरडाओरड केली. ते पाहून जवळ असलेला एकजण तिथे आला. परंतु, त्यालाही पोहता येत नसल्याने उपयोग झाला नाही. दरम्यान, अभिजितचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी अहमदपूर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अभिजितचा मृतदेह पोउपनि. बालाजी पल्लेवाड, पोकॉ प्रशांत किर्ते, पोकॉ. नारायण बेंबडे, पोहेकॉ व्ही.जी. संमुखराव आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी कांबळे व त्यांच्या सहका-यांच्या मदतीने पाण्याबाहेर काढण्यात आला.