लातुरात विकासापेक्षा पक्षांतरावर जोरदार चर्चा; महापालिकेसाठी लढाई अटीतटीची!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:27 IST2025-12-16T12:27:44+5:302025-12-16T12:27:50+5:30
मागील लातूर महापालिकेची निवडणूक १९ एप्रिल २०१७ मध्ये झाली. त्यावेळी भाजपा-काँग्रेसमध्ये थेट लढत होती

लातुरात विकासापेक्षा पक्षांतरावर जोरदार चर्चा; महापालिकेसाठी लढाई अटीतटीची!
लातूर : महापालिकेच्या रणधुमाळीला प्रारंभ होण्यापूर्वी लातुरात विकासापेक्षा पक्षांतरावर जोरदार चर्चा सुरू आहे. एकंदर, राजकीय उलथापालथी घेऊन येणारी ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. १८ प्रभाग आणि ७० जागांसाठी मतदारांचे दार इच्छुक ठोठावत आहेत.
मागील लातूर महापालिकेची निवडणूक १९ एप्रिल २०१७ मध्ये झाली. त्यावेळी भाजपा-काँग्रेसमध्ये थेट लढत होती. ७० पैकी ३६ नगरसेवक निवडून आल्याने भाजपा सत्तेत आली. त्यावेळी काँग्रेसनेही ३३ जागा जिंकून जोरदार टक्कर दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका जागेवर होता. काठावरचे बहुमत घेऊन पहिल्या अडीच वर्षांत भाजपाचे महापौर आणि उपमहापौर सत्तेत राहिले. मात्र त्यानंतर भाजपाने मिळविलेल्या बहुमताला काँग्रेसने सुरुंग लावला. काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे महापौर झाले. तर हातमिळवणी करीत भाजपाचे चंद्रकांत बिराजदार उपमहापौर झाले. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा यांच्यासह दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीसह सर्वच पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. २०१७ मध्येही स्वतंत्र लढले, आताही तोच कित्ता गिरवला जाण्याची दाट शक्यता आहे.
दोन्ही महापौरांनी पक्ष सोडले
महापौर सुरेश पवार यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला आहे. तर अडीच वर्षे महापौर राहिलेल्या विक्रांत गोजमगुंडे यांनी काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले आहे. सत्तेत राहिलेल्या दोन्ही महापौरांनी आपापले पक्ष सोडून नवीन घरोबा केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, गिरीश पाटील यांचे पक्षांतर चर्चेत आहे.