औशाजवळ भीषण अपघात, काळी पिवळी-जीपची समोरासमोर धडक; तीन ठार, 13 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 00:16 IST2021-12-26T00:13:44+5:302021-12-26T00:16:16+5:30
अपघातातील मृतांचे नातलग सोबत नसल्याने उशीरापर्यंत त्यांची नावे कळू शकली नाही. अपघातातील इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून १० जण किरकोळ जखमी आहेत.

औशाजवळ भीषण अपघात, काळी पिवळी-जीपची समोरासमोर धडक; तीन ठार, 13 जखमी
लातूर- औसा-लामजना मार्गावरील वाघोली पाटीजवळ बोलेरो जीप व काळीपिवळीचा शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर आहेत. तर १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती.
प्रवासी वाहतूक करणारी काळीपिवळी एमएच २४ एफ ०९५९ ही औशाहून लामजन्याकडे प्रवासी घेऊन जात होती. तर लामजन्याहून औशाकडे भरधाव येणाऱ्या एमएच-३०- एए ४८०९ क्रमांकांच्या बोलेरो जीपची वाघोली पाटीजवळ समोरासमोरधडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की यात काळीपिवळी जीपचा चक्काचूर झाला तर बोलेरो १५० फुट लांब जावून खड्ड्यात पडली. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. तर एकाचा लातूर येथे उपचारासाठी घेऊन जाताना मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
अपघातातील मृतांचे नातलग सोबत नसल्याने उशीरापर्यंत त्यांची नावे कळू शकली नाही. अपघातातील इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून १० जण किरकोळ जखमी आहेत. सर्वांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी औसा पोलिसांनी पाहणी करून वाहतूक सुरळीत केली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांनीही घटना स्थळाला भेट दिली.
दरवाजे तोडून बाहेर काढले प्रवासी...
अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. जखमीसह मृतांनाही जीपचे दरवाजे तोडून बाहेर काढावे लागले. प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमधील मयत असल्याने नेमकी कोण कोठून बसले, कोणत्या गावातील होते याची माहिती पोलिसांनाही नव्हती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मयत व जखमींची नावे कळली नसल्याचे औसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी सांगितले.