किनगाव (जि. लातूर) : येथील एका व्यापाऱ्याचा एकुलता एक २३ वर्षांचा मुलगा छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य लाेकसेवा आयाेग (एमपीएससी) परीक्षेची तयारी गत दीड वर्षापासून करत होता. दरम्यान, ताे मित्रांसोबत कोकणात फिरण्यासाठी गेला असता, ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात त्याचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. मयत युवकाचे नाव महेश रमेश गुट्टे असे आहे.
किनगाव (ता. अहमदपूर) येथील व्यापारी रमेश शंकरराव गुट्टे यांचा मुलगा महेश (२३) गेल्या दीड वर्षापासून छत्रपती संभाजीनगर येथे एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. तो मित्रांसोबत कोकणात चारचाकी वाहनातून फिरण्यासाठी गेला होता. सोबत एक स्पोर्ट बाईकही मित्राने घेतली होती. घाटातील निसर्ग सौंदर्य मोबाइलमध्ये टिपताना महेश हा स्पोर्ट बाईकवरून जात होता.
पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगावला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात गुरुवारी दुपारी स्पोर्ट बाईकचा अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेल्या महेश गुट्टेचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर देवकरा येथे रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी, चुलते असा परिवार आहे.