टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 19:52 IST2025-08-31T19:50:46+5:302025-08-31T19:52:28+5:30

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या विजयकुमार घोगरे यांचा आझाद मैदानात हृदयविकाराने मृत्यू झाला.

Takalgaon's Vijaykumar' ghogare's body cremated, mother, wife and children cried lot | टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा

टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा

सलीम सय्यद 
अहमदपूर (जि. लातूर) :
मराठा आरक्षणासाठीमुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील टाकळगावचे सुपुत्र विजयकुमार घोगरे हे तीन दिवसांपूर्वी घरातून जाताना मी लवकरच परत येईन, असे सांगून गेले होते. मात्र मुंबईच्या आझाद मैदानात शनिवारी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. रविवारी दुपारी त्यांचे पार्थिव गावात आणताच दारासमोर आलेली रुग्णवाहिका पाहून आई, पत्नी आणि मुलांनी एकच हंबरडा फोडला. यावेळी ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले. हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत विजयकुमार यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

आझाद मैदानावर सहकाऱ्यांसोबत हातात झेंडा, डोळ्यांत निर्धाराची ज्वाळा, पण अचानक हृदयविकाराचा झटका आला. काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी ही वार्ता गावात कळताच संपूर्ण गाव शोकमग्न झाले. रविवारी दुपारी ४.१५ वाजता रुग्णवाहिकेतून टाकळगाव येथे पार्थिव आणण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह परिसरातील समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. पार्थिव पाहून कुटुंबियांचा आक्रोश सुरू होता. उपस्थित माता-भगिणी हुंदके देत होत्या. आई मीराबाई, पत्नी अंजली यांच्या आक्रोशाने संपूर्ण ग्रामस्थ स्तब्ध झाले. तू म्हणालास ना, लवकर येशील, मग का नाही आलास रे विजू... असे म्हणत आईने हंबरडा फोडला. मुलगा माऊली आणि अविराज हे दोघे आई व आजीकडे पाहून तेही रडत होते. यावेळी ग्रामस्थांनी विजयकुमार अमर रहे... च्या घोषणा देत आरक्षणासाठी त्यांचे हे बलिदान समाज कधीही विसरणार नाही, असा जयघोष केला.

अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा...

विजयकुमार घोगरे यांच्या वडिलांना दोन एकर कोरडवाहू शेती आहे. यातूनच त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह होतो. घरची परिस्थिती जेमतेम, शिक्षण बारावीपर्यंत झाले. शेती आणि छोटेमोठे काम करून विजयकुमार कुटुंब सांभाळत होते. त्यांना समाजकारणाची खूप ओढ होती. २७ ऑगस्टला गावातून ४५ तरुण दोन टेम्पो भरून मुंबईकडे निघाले. त्यात विजयकुमार हे सर्वात पुढे होते. आरक्षण मिळाल्याशिवाय परतणार नाही, असा शब्द त्यांनी जाताना पत्नी आणि आईला दिला होता.

एक योद्धा गेला, पण लढा कायम...
विजयकुमार घोगरे हा मुलगा समाजासाठी नेहमी पुढे असायचा. आंदोलनासाठी स्वत:ची गाडी द्यायचा. आज तो नाही. त्याचे बलिदान वाया जाऊ नये, आरक्षण मिळवून देणे हीच खरी श्रद्धांजली आहे. एक योद्धा गेला, पण आमचा लढा कायम राहणार, असा निर्धार समाजबांधवांनी केला. अहमदपूर, लातूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Takalgaon's Vijaykumar' ghogare's body cremated, mother, wife and children cried lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.