पंढरपूरच्या दुचाकी चालकास भरधाव कंटेनरने भातांगळी परिसरात उडविले!

By राजकुमार जोंधळे | Updated: June 2, 2025 09:57 IST2025-06-02T09:57:56+5:302025-06-02T09:57:56+5:30

नांदेड-लातूर महामार्गावर रात्री ८.४५ वाजताचा अपघात

Speeding container hit a two wheeler rider from Pandharpur on the Nagpur Ratnagiri National Highway | पंढरपूरच्या दुचाकी चालकास भरधाव कंटेनरने भातांगळी परिसरात उडविले!

पंढरपूरच्या दुचाकी चालकास भरधाव कंटेनरने भातांगळी परिसरात उडविले!

लातूर : सोलापूर जिल्ह्यातील बारडी (ता. पंढरपूर) येथील दुचाकी चालकाला भरधाव कंटेनरने जोराने उडविल्याची घटना रात्री ८.४५ वाजता नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील भातांगळी गावच्या उड्डाण पुलानजीक घडली. यामध्ये दुचाकी चालक ठार झाला आहे. याबाबत लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कंटेनर चालकाविरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, बारडी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सिद्धेश्वर पंडित भोसले (वय ३०) हे डोंगरगाव (ता. पालम जि. परभणी) येथे कुटुंबासह वास्तव्याला आहेत. ते दुचाकीवरून रात्री प्रवास करीत होते. दरम्यान, भातांगळीनजीक उड्डाण पुलाच्या समोर भरधाव कंटेनरने (एनएल ०१ एडी ३८८८) दुचाकीला (एमएच २२ एएस ०१४५) पाठीमागून जोराने उडविले. या अपघातात दुचाकी चालक सिद्धेश्वर पंडित भोसले हे ठार झाले. याबाबत प्रारंभी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर मयत दुचाकी चालकाची पत्नी भाग्यश्री सिद्धेश्वर भोसले (वय २८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कंटेनर चालक राजू मारोती थोरबोले (रा. शिरनारंगी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. सुदर्शन पाटील हे करीत आहेत. 

भरधाव दुचाकी झाडावर आदळली; एक तरुण ठार

शेताकडून खोपेगावकडे निघालेली भरधाव दुचाकी वळण रस्त्यावर एका झाडावर आदळल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लातूर नजीक घडली. यात एक तरुण ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

खोपेगाव येथील लिंबराज (३०) आणि महादेव हे दोघेजण दुचाकीवरून शेताकडे गेले होते. दरम्यान, शेतावरून घराकडे परत येताना वळण रस्त्यावर त्यांची दुचाकी एका झाडावर आदळली. या अपघातात एक तरुण ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाला प्रारंभी लातुरातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. तेथील उपचारानंतर पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती लातूर ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी रात्री उशिरा दिली.

Web Title: Speeding container hit a two wheeler rider from Pandharpur on the Nagpur Ratnagiri National Highway