लातूर-जहिराबाद महामार्गावर रात्री  भरधाव कारची समोरासमोर धडक, प्रवासी जखमी

By राजकुमार जोंधळे | Updated: June 9, 2025 05:50 IST2025-06-09T05:50:11+5:302025-06-09T05:50:22+5:30

Latur Accident News: लातूर-जहिराबाद महामार्गावर शिवणी पाटी येथे रविवारी रात्री भरधाव दोन कारची समोरासमोर जोराची धडक झाल्याची घटना घडली. कारमधील जखमींना स्थानिक नागरिकांनी दुसऱ्या वाहनातून लातूरला उपचारासाठी हलविले.

Speeding car collides head-on on Latur-Zahirabad highway at night, passenger injured | लातूर-जहिराबाद महामार्गावर रात्री  भरधाव कारची समोरासमोर धडक, प्रवासी जखमी

लातूर-जहिराबाद महामार्गावर रात्री  भरधाव कारची समोरासमोर धडक, प्रवासी जखमी

- राजकुमार जोंधळे 
लातूर - जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गावर गेल्या दोन आठवड्यापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. लातूर-जहिराबाद महामार्गावर शिवणी पाटी येथे रविवारी रात्री भरधाव दोन कारची समोरासमोर जोराची धडक झाल्याची घटना घडली. कारमधील जखमींना स्थानिक नागरिकांनी दुसऱ्या वाहनातून लातूरला उपचारासाठी हलविले. अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले आहे.

निलंगा येथून लातूरकडे निघालेली आणि लातूरहून निलंग्याकडे जाणाऱ्या दोन्ही कारची शिवणी पाटी येथे रविवारी रात्री ९ वाजता समोरासमोर धडक झाली. या दोन्ही कारमध्ये तीन-तीन प्रवासी होते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी औसा पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रात्री १२ वाजता पाहणी केली.

लातूर-जहिराबाद महामार्ग अपघात मार्ग !
गेल्या दोन आठवड्यामध्ये लातूर-जहिराबाद महामार्गावर मोठे चार अपघात झाल्याची नोंद आहे. आठवड्यातून किमान एक-दोन अपघात होत आहेत. हा महामार्ग ‘अपघात’मार्ग ठरत आहे. महामार्गावरील ब्लॅक स्पॉटमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. हे ब्लॅकस्पॉट दूर करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.

‘ब्लॅक स्पाॅट’मुळे अपघातात वाढ...
निलंगा ते लातूर दरम्यान सर्वाधिक अपघात झाल्याची नोंद गेल्या वर्षभरात पोलिस दप्तरी आहे. यामध्ये जीवितहानीही मोठी झाली आहे. हे अपघात रोखण्यासाठी महामार्गावरील ब्लॅक स्पॉट दूर करण्याची गरज आहे. उदगीर मोड, निटूर, केळगाव, शिवणी पाटी, बाभळगाव आणि बाभळगाव नाका दरम्यान अपघात घडत आहेत.

महामार्गाला गेले तडे..!
लातूर-जहिराबाद महामार्गाला तडे गेले असून, याबाबत स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी अनेकदा संताप व्यक्त केला आहे. मात्र हे तडे, पडलेल्या भेगा दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. या भेगांमुळे दुचाकींचे अपघात वाढले आहेत. शिवाय, चालकांचे नियंत्रणही सुटत असल्याचे वाहनधारकांनी सांगितले. 

रात्री घटनास्थळाची पाहणी...
लातूर-जहिराबाद महामार्गावर बाभळगाव ते शिवणी पाटी दरम्यान दोन कारचा समोरासमोर अपघात झाल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली. औसा ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले आहे. जखमींची संख्या मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. - सुनील रेजितवाड, पोलिस निरीक्षक, औसा

Web Title: Speeding car collides head-on on Latur-Zahirabad highway at night, passenger injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.