सासरवाडीला निघालेला जावई अपघातामध्ये ठार, लेकराला पाहण्यापूर्वीच काळाने गाठलं
By राजकुमार जोंधळे | Updated: January 25, 2026 05:46 IST2026-01-25T05:44:36+5:302026-01-25T05:46:26+5:30
Latur Accident News: ज्या घरात चार दिवसांपूर्वीच पाळणा हलला, तिथे आज सुतकाचे सावट पसरले आहे. आपल्या पहिल्याच ‘पुत्ररत्नाचे’ तोंड पाहण्यासाठी आनंदाने सासुरवाडीला निघालेल्या एका २२ वर्षीय तरुण बापाचा वाटेतच काळाने घास घेतला.

सासरवाडीला निघालेला जावई अपघातामध्ये ठार, लेकराला पाहण्यापूर्वीच काळाने गाठलं
- राजकुमार जाेंधळे
लातूर - ज्या घरात चार दिवसांपूर्वीच पाळणा हलला, तिथे आज सुतकाचे सावट पसरले आहे. आपल्या पहिल्याच ‘पुत्ररत्नाचे’ तोंड पाहण्यासाठी आनंदाने सासुरवाडीला निघालेल्या एका २२ वर्षीय तरुण बापाचा वाटेतच काळाने घास घेतला. निलंगा-उदगीर राज्य मार्गावरील हंचनाळ पाटीनजीक झालेल्या भीषण अपघातात हा तरुण जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील होनमाळ येथील रहिवासी खाजा मेहनोदीन इस्माईल शेख (वय २२) याला चार दिवसांपूर्वीच पुत्ररत्न प्राप्त झाले होते. बाळ आणि बाळंतीण पत्नी सध्या उदगीर तालुक्यातील तोगरी येथे सासुरवाडीला होते. आपल्या चिमकुल्याला पहिल्यांदा कडेवर घेण्यासाठी खाजा शेख हे आपल्या दुचाकीवरून (एम.एच. २४ डब्ल्यू. ७१७९) तोगरीकडे निघाले होते. मात्र, हंचनाळ शिवारात नियतीने त्याच्यावर घाला घातला.
पुलाच्या बाेर्डाला दुचाकी धडकली
निलंगा-उदगीर रस्त्यावर हंचनाळ पाटीनजीक एका पुलाचे काम अनेक दिवसांपासून संथगतीने सुरू आहे. या ठिकाणी वळण रस्ता अथवा वाहनधारकांसाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा सुविधांचा (बॅरिकेड्स किंवा रिफ्लेक्टर्स) अभाव असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने खाजा यांची दुचाकी पुलाच्या बोर्डाला जोरात धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, खाजा यांचा जागीच मृत्यू झाला.
होनमाळ गावावर शोककळा
अवघ्या २२ वर्षांच्या तरुणाचा असा अकाली मृत्यू झाल्याने होनमाळ गावावर शोककळा पसरली आहे. आपल्या पित्याला कधीच न पाहिलेल्या त्या चिमकुल्याचा आणि त्याच्या आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. घटनेची माहिती मिळताच देवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.