'साहेब, मला वाचवा!'; खदानीतून तरुणीची आर्त हाक, होमगार्डने जीव धोक्यात घालून वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 20:09 IST2025-09-25T20:08:22+5:302025-09-25T20:09:02+5:30
होमगार्डचे धाडस आले कामी; पोलिसांना मदतीसाठी हाक देणाऱ्या तरुणीचा वाचला जीव

'साहेब, मला वाचवा!'; खदानीतून तरुणीची आर्त हाक, होमगार्डने जीव धोक्यात घालून वाचवले प्राण
- महेबूब बक्षी
औसा (लातूर): नैराश्यातून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने औसा-लातूर महामार्गालगतच्या कारंजे खडी केंद्रातील खदानीत उडी घेतलेल्या एका २१ वर्षीय तरुणीचा जीव औसा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि एका होमगार्डच्या अतुलनीय धाडसामुळे वाचला आहे. मृत्यूच्या दाढेतून "साहेब, मला वाचवा!" अशी हाक देणाऱ्या या तरुणीला वाचवण्यासाठी होमगार्डने कसलाही विचार न करता खोल पाण्यात उडी घेतली.
मूळची खरोसा येथील ही तरुणी वडिलांच्या निधनानंतर नैराश्यात होती. जीवन संपवण्याचा निर्णय घेऊन तिने बुधवारी रात्री ११:२० वाजण्याच्या सुमारास कारंजे खडी केंद्रातील खदानीत निवड केली. खदानीत उडी घेतल्यानंतर ती कडेच्या झाडाला अडकली. याचवेळी मरण्याचा विचार बदलताच तिने तातडीने आपल्या मोबाईलवरून ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना ‘मी आत्महत्या करत आहे, मला वाचवा’ अशी आर्त हाक दिली.
लातूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ हे लोकेशन औसा पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस निरीक्षक रेवन डमाले यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अतुल डाके, सचिन मंदाडे यांच्यासह होमगार्ड उद्धव दळवे आणि इतर जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
होमगार्डचे अतुलनीय धाडस, 'वर्दी'चा सन्मान
अंधारात आवाजाच्या दिशेने धाव घेत, होमगार्ड उद्धव दळवे यांनी वर्दीसह कसलाही विचार न करता रात्री ११:३० वाजता खोल खाणीत उडी घेतली. होमगार्ड दळवे यांनी सुमारे १५ मिनिटे खोल पाण्यात बुडत असणाऱ्या त्या तरुणीच्या केसांना धरून तिला काठाजवळ आणले आणि इतरांच्या मदतीने ओढणीच्या सहाय्याने सुखरूप वर काढले. दळवे यांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एकाचा जीव वाचल्याचे समाधान
होमगार्ड उद्धव दळवे म्हणाले, "मेलो तरी चालेल, पण त्या मुलीला वाचवायचे या भावनेने मी खदानीत उडी घेतली. एकाचा जीव वाचल्याने माझे जीवन सार्थक झाले." सध्या तरुणीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले असून, औसा पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे आणि धाडसामुळे एका कुटुंबाचा आधार वाचला आहे.