हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथे सातत्याने विजेचा लपंडाव होत आहे. त्यामुळे वीज कधी येईल आणि कधी जाईल, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. परिणामी, गावातील नागरिकांना विविध समस्यांना सामाेरे जावे लागत आहे. ती येते अन् क्षणात गुल होते, असे म्हणण्याची वेळ गावातील ग्राहकांवर आली आहे.
उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी हे बाजारपेठेचे गाव आहे. गावात विद्युत ग्राहकांची संख्याही मोठी आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून गावात विजेचा लपंडाव सुरु आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी गावात डीपी आहे. परंतु, डीपीवर जास्त भार वाढल्याने सतत बिघाड होत आहे. परिणामी, विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.
गावातील बहुतांश ग्राहक नियमितपणे वीजबिलाचा भरणा करतात. परंतु, काहीजण अनधिकृतरीत्या वीज वापरत असल्याचे पहावयास मिळत आहे. परिणामी, डीपीवर अतिरिक्त भार वाढत आहे. हाळी गावातील घोगरे डीपी, ढोर गल्लीतील डीपी, बसस्थानक परिसर, हंडरगुळी गावातील जनावरांचा बाजार, पाण्याची टाकी आदी भागातील डीपी नेहमी उघड्याच असतात. या सर्व डीपीवर वाढलेल्या भारामुळे नेहमी वीज गुल होत आहे.
तसेच कमी- जास्त विद्युत पुरवठ्यामुळे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून नुकसान होत आहे.
सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा परिणाम विद्युत यंत्रणेवर आधारित असलेल्या छोट्या- मोठ्या व्यवसायावर होत आहे. वीज कधी येईल, आणि कधी जाईल हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे, दररोज सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत भारनियमन आहे. याशिवाय, सातत्याने वीज गुल होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी परमेश्वर माने, संतोष माने, विजय जोगदंड, आदर्श माने, गौसुद्दीन शेख यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
लाईनमनची धावपळ...
गावातील वीजपुरवठा खंडित झाला की लाईनमनची धावपळ सुरू होते. काही वेळानंतर वीजपुरवठा पूर्ववत केला जातो. परंतु, तो काही वेळच असतो. पुन्हा वीज गुल होते. वीजपुरवठा सातत्याने कशामुळे खंडित होत आहे, हे अद्यापही समजले नाही. त्यामुळे गावातील नागरिक वैतागले आहेत.