एक कॉल करू द्या म्हणत मोबाईलच पळवला; लातुरात मोबाईल हिसकावणारे दोघे अटकेत
By राजकुमार जोंधळे | Updated: November 5, 2022 19:22 IST2022-11-05T19:21:52+5:302022-11-05T19:22:09+5:30
मदत मागण्याच्या बहाण्याने दमदाटी करत माेबाइल हिसकावणाऱ्या दाेघांना पोलिसांनी उचलले !

एक कॉल करू द्या म्हणत मोबाईलच पळवला; लातुरात मोबाईल हिसकावणारे दोघे अटकेत
लातूर : दमदाटी करत जबरदस्तीने माेबाइल हिसकावणाऱ्या दाेघांना शिवाजीनगर ठाण्याच्या पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून माेबाइल, माेटरसायकलसह ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, ३० ऑक्टाेबर राेजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी युवकाच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दाेघांनी फोन लावण्याचा बहाणा केला. फिर्यादीला हिसका मारून जबरदस्तीने मोबाइल घेत पळ काढला. हे आराेपी लातुरातील इंदिरा नगर, बस्तापूरनगर येथील राहणारे आहेत, अशी खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने दाेघांनाही घरातून उलचले. अधिक चाैकशी केली असता, त्यांनी आपली नावे पवन सिद्धेश्वर कांबळे (वय २३, रा. इंदिरा नगर, लातूर), विशाल गौतम जोगदंड (वय १९, रा. बस्तापूरनगर, लातूर) असे सांगितले. त्यांची झाडाझडती घेतली असता, माेबाइल फाेन आढळून आला. चाैकशी केली असता हा मोबाइल एका युवकाला दमदाटी करून हिसकावत पळविल्याचे सांगितले. यामध्ये त्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चोरीतील मोबाइल असा ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास पोलीस अमलदार चौगुले करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे, अशोक चौगुले, गोविंद चामे, युवराज गिरी, संदेश सन्मुखराव यांच्या पथकाने केली.