पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांना आयआयटी कानपूरचा सत्येंद्रकुमार दुबे पुरस्कार
By राजकुमार जोंधळे | Updated: September 26, 2023 18:39 IST2023-09-26T18:38:15+5:302023-09-26T18:39:01+5:30
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे हे त्याच्या प्रामाणिक, कुशाग्र आणि धाडसी प्रतिमेेमुळे ओळखले जातात.

पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांना आयआयटी कानपूरचा सत्येंद्रकुमार दुबे पुरस्कार
लातूर : भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरच्या वतीने देण्यात येणारा सत्येंद्रकुमार दुबे स्मृती पुरस्कार यंदा लातूर जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांना जाहीर झाला आहे. सत्येंद्रकुमार दुबे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांना दिला जातो.
आयआयटी कानपूरच्या (२ नोव्हेंबर) स्थापना दिनी हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या पुरस्कारासाठी आयआयटी कानपूर संस्थेने लातूर येथील जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांची निवड केली आहे. सोमय मुंडे हे आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. सत्येंद्रकुमार दुबे हे आयआयटी कानपूरचे विद्यार्थी होते. अभियंता सत्येंद्रकुमार दुबे यांचा प्रामाणिकपणामुळे बळी गेला. भारतीय तंत्रज्ञान कानपूरची स्थापना १९५९ साली झाली असून, भारतीय तंत्रज्ञान संस्था, ग्रँड ट्रॅक रोडवर, कल्याणपूरनजीक आहे. १९६३ साली भारतात संगणक विज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सर्वप्रथम भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूरने प्रारंभ केला.
२६ नक्षलवाद्यांचा पथकाने केला खात्मा...
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे हे त्याच्या प्रामाणिक, कुशाग्र आणि धाडसी प्रतिमेेमुळे ओळखले जातात. पोलिस अधीक्षक मुंडे यांनी १३ नोव्हेंबर २०२१ मध्ये गडचिरोलीतील मर्दिनटोला छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या घनदाट जंगलाच्या परिसरात आपल्या तुकडीच्या जवानांसोबत २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. याची दखल घेत भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा मानाचा शौर्य पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला आहे.