तेरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा; पाच कढईसह इतर साहित्य जप्त
By राजकुमार जोंधळे | Updated: May 18, 2025 11:31 IST2025-05-18T11:31:04+5:302025-05-18T11:31:43+5:30
औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात सहा जणांविराेधात गुन्हा...

तेरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा; पाच कढईसह इतर साहित्य जप्त
औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातील तेरणा नदीपात्रात महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या हद्दीतील वाळूचा उपसा करणाऱ्यांवर पथकाने छापा मारला. यावेळी पाच लाेखंडी कढईसह इतर साहित्य असा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, वाळू चाेरणारे आरोपी कर्नाटक राज्यात पसार हाेण्यात यशस्वी झाले.
औराद शहाजानी परिसरातून तेरणा नदी वाहते. या नदीपात्रात आजही पाणीसाठा बऱ्यापैकी शिल्लक असून, अवैध वाळू उपसा सुरूच आहे. ही वाळू चाेरट्या मार्गाने वाहतूक करून विक्री केली जात असल्याचे समाेर आले आहे. नदीपात्रात पाणी असल्याने शासकीय वाळू घाटांचा लिलाव अद्याप झालेला नाही. परिणामी, या भागातील महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील वाळू माफियांचा या भागांत मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे. सतत कधी कढई, तर कधी बोटीच्या माध्यमातून वाळूचा उपसा केला जात आहे. या वाळू माफियांनी नदीपात्रात कढईच्या माध्यमातून वाळू काढण्याची शक्कल लढवली असून, माेठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा केला जात आहे. दरम्यान, औराद शहाजानी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांना खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे त्यांनी शनिवारी नदीपात्रात छापा मारला. यावेळी नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या टोळीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, नदीपात्रापलीकडचा निम्मा भाग हा कर्नाटक राज्यात येत असल्याने हे वाळू माफिया कर्नाटकात पळून जाण्यात यशस्वी ठरले. नदीपात्रात असलेल्या लोखंडी पाच कढई आणि इतर साहित्य असा एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात पाच ते सहाजणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्रं-दिन वाळूचा सुरू आहे उपसा... -
नदीपात्राच्या पाण्यातून लोखंडी कढईत टोपले आणि बकेटच्या माध्यमातून वाळूचा उपसा केला जात आहे. कढईत वाळू भरून ती नदीतीरावर आणून ट्रॅक्टरमध्ये भरली जात आहे. या माध्यमातून उपसण्यात आलेली अवैध वाळू अव्वाच्यासव्वा दराने बाजारात विक्री केली जात असल्याचे छाप्यात समाेर आले आहे.