अश्वांमध्ये आढळणाऱ्या ग्लँडर्स तपासणीत दिलासा; दोन नमुने निगेटिव्ह, एक अहवाल प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:37 IST2025-06-25T16:35:52+5:302025-06-25T16:37:07+5:30

जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून अश्वपालकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता तपासणीसाठी नमुने गोळा करताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे.

Relief in glanders test found in horses; Two samples negative, one report awaited | अश्वांमध्ये आढळणाऱ्या ग्लँडर्स तपासणीत दिलासा; दोन नमुने निगेटिव्ह, एक अहवाल प्रतीक्षेत

अश्वांमध्ये आढळणाऱ्या ग्लँडर्स तपासणीत दिलासा; दोन नमुने निगेटिव्ह, एक अहवाल प्रतीक्षेत

लातूर : अश्वांमध्ये आढळणाऱ्या ''ग्लँडर्स'' या अत्यंत गंभीर आणि संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लातूर जिल्हा पशुसंवर्धन विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे. या व्यापक तपासणी मोहिमेला जिल्ह्यातील अश्वपालकांकडून सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे रोगावर नियंत्रण मिळवण्याची आशा पल्लवित झाली आहे.

पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा, औंध, पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या चार संशयित अश्वांच्या नमुन्यांपैकी तीन नमुने निगेटिव्ह आले असून, एका नमुन्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे, ही दिलासादायक बाब आहे. याव्यतिरिक्त, २० जून २०२५ रोजी लातूर शहरातील ८५ अश्वांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत आणि उर्वरित अश्वांचे नमुने गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या स्पष्ट सूचना आणि मार्गदर्शनामुळे जिल्ह्यातील अश्वपालकांमध्ये या गंभीर आजाराविषयी आणि त्याच्या प्रतिबंधक उपायांविषयी मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे. तपासणी आणि रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सर्व अश्वपालक अत्यंत सकारात्मकपणे सहभागी होत आहेत आणि आपल्या घोड्यांच्या आरोग्याबाबत सजगता दाखवत आहेत.

जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून अश्वपालकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता तपासणीसाठी नमुने गोळा करताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे. ही तपासणी केवळ घोड्यांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी तपासणी, नमुना संकलन आणि उपचारांबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत.

अश्व पालकांचे तपासणीसाठी सहकार्य
डॉ. सुधाकर साळवे, सहा आयुक्त पशुसंवर्धन, डॉ. सुदर्शन मुंडे, पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, लातूर, डॉ. श्रीधर जी. शिंदे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, लातूर यांनी अश्वपालकांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले असून, त्यांच्या सहकार्यामुळेच ग्लँडर्सवर नियंत्रण मिळवून अश्वांचे आरोग्य टिकवणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Web Title: Relief in glanders test found in horses; Two samples negative, one report awaited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.