आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 21:42 IST2025-07-30T21:40:05+5:302025-07-30T21:42:50+5:30
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार देणाऱ्या मुलाची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
आई-वडिलांना पोटगी देण्यासाठी आदेश दिलेला असतानाही मुलाने त्या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याने उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी मुलास एक महिन्यासाठी तुरुंगात पाठविले आहे.
उपजिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, उपजिल्हाधिकारी कार्यालयात अब्दुल मजीद अब्दुल हमीद व अमीरबी अब्दुल मजीद शेख (रा. महेबूबपुरा, उदगीर) यांनी आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ व नियम २०१० अंतर्गत त्यांचा मुलगा नजीब अब्दुल मजीद शेख याच्याकडून पोटगी मिळण्याबाबतचा अर्ज दाखल केला होता. या अर्जानुसार कार्यवाही करून अर्जदाराच्या मुलाने आई-वडिलांस प्रत्येकी तीन हजार रुपये दर महिन्यास त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी, असा आदेश उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी दिला होता; परंतु आदेश देऊनही मुलगा आई-वडिलांना निर्वाह भत्ता देत नसल्याने त्यांनी मुलाच्या विरोधात उदगीर उपजिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी सुशांत शिंदे यांच्याकडे अर्ज सादर केला होता.
त्यानुसार मुलाला अनेकदा वसुली वॉरंट बजावून पोटगीची थकीत १ लाख ५६ हजार रुपये भरणा करण्याबाबत कळविले. सदरील रक्कम भरणा न केल्याने मुलगा नजीब अब्दुल मजीद शेख (रा. महेबूबपुरा, उदगीर) यास ३० दिवसांसाठी लातूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोटगीसंदर्भात आदेश देऊनही ज्या ज्येष्ठ नागरिकांस पोटगी मिळत नसल्यास त्यांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा, असे आवाहन केले आहे.