"अजितदादांच्या अपघाताची 'CBI' चौकशी व्हावी!"; रामदास आठवलेंनी मांडली स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 18:06 IST2026-02-27T18:05:23+5:302026-02-27T18:06:06+5:30
माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आला असला तरी, पुन्हा निवडीसाठी माझे नाव अधिकृत असेल, यात मला कोणतीही अडचण वाटत नाही

"अजितदादांच्या अपघाताची 'CBI' चौकशी व्हावी!"; रामदास आठवलेंनी मांडली स्पष्ट भूमिका
लातूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा विमान अपघात ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अजितदादा हे एक महान आणि धाडसी नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची सत्यता लोकांसमोर येण्यासाठी 'सीबीआय' चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी येथे केली.
लातूर दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आठवले यांनी विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. लातूरच्या नवोदय विद्यालयातील मुलीच्या मृत्यूबाबत बोलताना आठवले म्हणाले, त्या मुलीने आत्महत्या केली असली तरी, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पीडित कुटुंबाला समाजकल्याण विभागाच्या वतीने ४ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी मिळवून देण्यासाठी आणि मुख्यमंत्री निधीतून अतिरिक्त मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
राजकीय घडामोडी आणि राज्यसभा...!
स्वतःच्या उमेदवारीबद्दल बोलताना आठवले यांनी विश्वास व्यक्त केला. माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आला असला तरी, पुन्हा निवडीसाठी माझे नाव अधिकृत असेल, यात मला कोणतीही अडचण वाटत नाही, असे त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार आमचे जुने मित्र आहेत, ते पुन्हा राज्यसभेवर आले तर आम्हाला आनंदच होईल. शरद पवार जर एनडीएमध्ये आले असते, तर ते कदाचित देशाचे राष्ट्रपती झाले असते. पण त्यांनी तो निर्णय योग्य वेळी घेतला नाही.
घातपाताच्या शंकेवर स्पष्टीकरण..!
अजित पवार यांच्या अपघाताबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेवर त्यांनी स्पष्ट मत मांडले. मला यात कोणताही घातपात वाटत नाही. घातपाताची शंका उपस्थित करणे म्हणजे अजितदादांच्या प्रतिमेला धक्का लावण्यासारखे आहे. मात्र, शंका दूर करण्यासाठी संपूर्ण चौकशी होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.