पावसाने पाठ फिरवल्याने भाजीपाला लागवडीची पाच कोटी रोपे करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 14:04 IST2019-06-19T13:54:20+5:302019-06-19T14:04:08+5:30
च कोटी रोपे पाण्याअभावी करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे़

पावसाने पाठ फिरवल्याने भाजीपाला लागवडीची पाच कोटी रोपे करपली
- बालाजी थेटे
औराद शहाजानी (जि़ लातूर) : दक्षिण भारतातून मराठवाड्यात येणारे मोसमी वारे अद्यापही पोहोचले नसल्याने त्याचा परिणाम लातूर जिल्ह्यातील शेतीवर झाला आहे़ पावसाच्या आशेवर १५ दिवसांत लागवड करण्यात आलेली भाजीपाल्याची जवळपास पाच कोटी रोपे पाण्याअभावी करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे़
लातूर जिल्ह्यात व कर्नाटक सीमा भागात दरवर्षी मोसमी पावसाअगोदर मोसमीपूर्व पाऊस चांगला होतो़ या आशेवर यंदा तेरणा व मांजरा नद्या व त्यावरील सर्व बंधारे कोरडीठाक असतानाही जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी टोमॅटो, ढोबळी मिरची, साधी मिरची, वांगे, दोडका आदी भाजीपाल्याची लागवड केली़ दरवर्षी मेच्या शेवटच्या आठवड्यात व जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील वडवळ नागनाथ, औराद शहाजानी, निलंगा, औसा, हेर, लातूररोड, निटूर, किल्लारी यासह सीमा भागात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते़
यंदा दुष्काळी परिस्थितीतही भाजीपाल्याची १० कोटी रोपांची लागवड करण्यात आली़ परंतु, पाण्याअभावी व अति तापमानामुळे जवळपास पाच कोटी रोपे करपून गेली आहेत. लातूर जिल्ह्यातील टोमॅटोला उत्तर भारतासह हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड या राज्यात मोठी मागणी असते़
तापमान वाढलेलेच
गेल्या आठवड्यापासून वाऱ्याचा वेग वाढला असून ताशी १४ कि.मी.ने वारे वाहत आहेत़ मृग संपत आला तरी कमाल व किमान तापमानात म्हणावी तशी घट झाली नाही़ सध्या कमाल तापमान ३७ तर किमान तापमान २९ अंशांवर आहे, असे येथील हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले़
लागवडीसाठी लाखोंचा खर्च
भाजीपाला लागवडीसाठी लाखो रुपयांचा खर्च झाला असल्याचे शेतकरी सुधाकर म्हेत्रे यांनी सांगितले़ पाऊसच न झाल्याने ही रोपे करपली. त्यामुळे शेतकऱ्यांचा लाखोंचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे परिसरातील बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे.
उत्पन्नात घट होणार
देशात भाजीपाल्याला मागणी वाढली आहे़ पण उत्पादन अल्प आहे़ वेळेवर पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे़ जी पिके जगली आहेत, त्यांना सध्याचे तापमान मानणार नाही़ त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होणार असल्याचे व्यापारी मुनीर पटेल यांनी सांगितले़
शेतकऱ्यांकडून दुबार लागवड
काही शेतकऱ्यांनी भाजीपाला रोपाची लागवड केली होती़ परंतु, हवेत बाष्प नसल्याने आणि पाणी नसल्याने ही रोपे करपून केली़ त्यामुळे काहींनी दुबार लागवड केली़ मात्र, पाऊसच नसल्याने तीही करपली असल्याचे औराद येथील नर्सरी चालक सत्यवान मुळे यांनी सांगितले़
चांगल्या उत्पादनाची आशा होती पण...
जूनच्या सुरुवातीस भाजीपाल्याची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळण्याबरोबर भावही मिळतो, या आशेने शेतकऱ्यांनी लागवड केली होती़ शेतकऱ्यांनी केलेला हा सर्व खर्च पाण्यात गेला आहे.