चंदन तस्करांच्या औशातील अड्ड्यावर छापा; तिघे अटकेत पण मुख्य आरोपी 'पुष्पा' पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 19:20 IST2025-06-04T19:18:04+5:302025-06-04T19:20:25+5:30

लातूरसह शेजारच्या जिल्ह्यातून अवैधरित्या चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचे मुख्य सुत्रधार औशातून सर्व यंत्रणा कार्यान्वित करतो.

Raid on sandalwood smugglers' hideout in Aush; Three arrested but main accused 'Pushpa' absconding | चंदन तस्करांच्या औशातील अड्ड्यावर छापा; तिघे अटकेत पण मुख्य आरोपी 'पुष्पा' पसार

चंदन तस्करांच्या औशातील अड्ड्यावर छापा; तिघे अटकेत पण मुख्य आरोपी 'पुष्पा' पसार

औसा:लातूर, धाराशिव जिल्ह्यासह इतर ठिकाणाहून चंदनाची बेकायदेशीररित्या तस्करी करणाऱ्या टोळीच्या औशातील अड्ड्यावर एटीएस पथकाने छापा टाकला. यात चार मोटारसायकल, ३० किलो चंदनाचा गाभा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. यासह घटनास्थळी तिघांना चंदनासह पकडून गजाआड करण्यात आले असून यातील मुख्य पुष्पा मात्र फरार झाला आहे. सदरच्या कारवाईत एकूण ३ लाख ३५ हजाराचा माल जप्त करुन चार जणांविरुद्ध औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औशातील इंदिरा नगर भागात असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये येथील चंदन तस्कर (पुष्पा) हे आपल्या टोळीच्या सहाय्याने औसा,लातूरसह परजिल्ह्यातून चोरट्या मार्गाने विनापरवाना चंदनाची तस्करी करुन त्याची साठवणूक करत होते. औशात दोन-तीन ठिकाणी वर्षानुवर्षे हा गोरखधंदा करण्यात येत असल्याने याची गुप्त माहिती मिळताच पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार एटीएस पथकाचे प्रमुख सपोनि आयुब शेख यांच्या पथकाने त्या शेडवर सोमवारी छापा टाकला. यात शेडमध्ये प्रतिबंधित व संरक्षित चंदनाची साल काढून तासलेला चंदनाचा गाभा व लाकडाची चोरटी वाहतूक करण्यासाठी साठवून ठेवलेले चंदनासह तिघे मिळून आले. 

घटनास्थळावरून चार मोटारसायकली,३० किलो चंदनाचा गाभा व चंदन व इतर साहित्य असा ३ लाख ३५ हजाराचा माल जप्त केला. तसेच सुरेश जाधव वय ४०, जनार्दन पवार वय ४०, सुर्यकांत जाधव वय ५२ वरील (सर्व रा.निलंगा तालुका) यांना अटक केली. तर मुख्य चंदनाचा तस्कर बालाजी व्हंताळे ( रा.औसा) हा मात्र फरार झाला झाला आहे. सपोनि आयुब शेख यांच्या फिर्यादीवरून कलम  ४१,४२ भारतीय वन अधिनियम १९२७ व ०४ महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम, ३०३(२)३ (५) भारतीय न्याय संहिता प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सपोनि उत्तमजाधव,पो. हा. रामहरी भोसले, विशाल गुंडरे, दीपक वैष्णव यांचा सहभाग होता.

चंदन तस्करीचे औसा मुख्य केंद्र
लातूरसह शेजारच्या जिल्ह्यातून अवैधरित्या चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचे मुख्य सुत्रधार औशातून सर्व यंत्रणा कार्यान्वित करतो. छोटे-मोठे तस्कर चंदनाची तोड करुन औशात विक्री करतात. शहरातील दोन ठिकाणी याची खरेदी करुन त्याचा गाभा काढून विक्री करण्यात येत असे. याकडे वनविभाग व पोलिसांचे दुर्लक्ष होते.

Web Title: Raid on sandalwood smugglers' hideout in Aush; Three arrested but main accused 'Pushpa' absconding