लातूरमध्ये पोलिसांचे सलग २१ तासांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’; ७४ आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 15:44 IST2026-03-30T15:43:21+5:302026-03-30T15:44:15+5:30
लातूर जिल्ह्यात नाकाबंदी; अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांच्या धडक धाडी

लातूरमध्ये पोलिसांचे सलग २१ तासांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’; ७४ आरोपींना अटक
लातूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था भक्कम राहावी, गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी लातूर पोलिसांनी सलग २१ तास ‘ऑल आऊट’ आणि ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून मोठा दणका दिला आहे. यात अवैध दारू अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. ७४ आराेपींना अटक करून जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, २८ मार्च रोजी पहाटे ५ वाजल्यापासून ते २९ मार्चच्या मध्यरात्री २ वाजेपर्यंत ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील दुर्गम भाग, हातभट्टीची ठिकाणे आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांनी एकाच वेळी ‘मास रेड’ टाकली. या मोहिमेत ७० टक्के पोलिस अधिकारी आणि अंमलदार रस्त्यावर उतरले होते. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.
विशेष मोहिमेदरम्यान, हातभट्टी, अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर ७४ गुन्हे दाखल केले आहेत. ७४ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमध्ये सुमारे ४ लाख १९ हजार ३४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये कच्चे रसायन, भट्टीचे साहित्य आणि देशी-विदेशी दारूचा समावेश आहे. घटनास्थळावरच मोठ्या प्रमाणावर रसायने नष्ट करण्यात आली.
कोम्बिंग ऑपरेशन, जिल्ह्यात नाकाबंदी...
रात्रीच्या वेळी राबवण्यात आलेल्या ‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये १९ सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. आर्म्स ॲक्टखाली ८ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. चोरीच्या तयारीत असलेल्या ४ संशयितांना ताब्यात घेतले. तसेच, ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ मोहिमेत २४ खटले दाखल करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात ३४ ठिकाणी कडक नाकाबंदी करून ३४ अधिकारी, १४९ अंमलदारांनी कसून तपासणी केली.
संशयास्पद हालचालींची माहिती पाेलिसांना द्यावी...
नागरिकांना माहिती द्यावी
लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारच्या व्यापक व अचानक कारवाया भविष्यातही सातत्याने सुरूच राहणार आहेत. स्थानिक नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी.
-अमाेल तांबे, पाेलिस अधीक्षक, लातूर