लातुरात पाणीपुरीवाल्या युवकाचा भोसकून खून! १८ तासात दुसरी घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: March 15, 2025 13:26 IST2025-03-15T13:26:01+5:302025-03-15T13:26:26+5:30

पोलिस पथकाकडून त्या मारेकऱ्यांचा शोध...

Panipuri seller stabbed to death in Latur Second incident in 18 hours | लातुरात पाणीपुरीवाल्या युवकाचा भोसकून खून! १८ तासात दुसरी घटना

लातुरात पाणीपुरीवाल्या युवकाचा भोसकून खून! १८ तासात दुसरी घटना

लातूर : राजस्थानातून लातुरात व्यवसायासाठी आलेल्या एका 19 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री 9.30 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास बार्शी रोडवरील हरंगुळ रेल्वे स्थानकानजीक पाण्याच्या टाकीलागत येथे घडली. शिवाजीनगर ठाण्यालगतच्या फुटपाथवर गुरुवारी झालेल्या खुनाच्या घटनेला 24 तास उलटत नाहीत तोपर्यंत दुसऱ्या खुनाची घटना घडली. या सलग खुनाच्या घटनांनी लातूर हादरले आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारी पहाटेपर्यत सुरु होती. 

पोलिसांनी सांगितले, राजस्थान येथून लातुरात पोट भरण्यासाठी आलेल्या दोघा भावंडांनी बार्शी रोडवर हरंगुळ रेल्वे स्थानक परिसरात पाण्याच्या टाकीनजीक पाणीपुरीचा ठेला लावला होता. तर मोठा भाऊ हरंगुळ मार्गावर एका ऑइल मीलसमोर ठेला लावला होता. नेहमीप्रमाणे 19 वर्षीय युवकाने शुक्रवारी सायंकाळी पाणीपुरीचा ठेला लावला. दरम्यान, रात्री 9.30 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्यावर धारदार शास्त्राने सपासप वार केले. चाकूने पोटात भोसकले. यामध्ये पाणीपुरीवला युवक जाग्यावरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून मारेकऱ्यांनी पळ काढला. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती त्याच्या मोठ्या भावाला देण्यात आली. भावाने घटनास्थळी धाव घेत, लातुर येथील शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घटनास्थळी लातूर शहर डीवायएसपी रणजीत सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवनी मिरकले, एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. 

याबाबत मयत युवकाच्या भावाच्या माहितीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवारी पहाटेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु होती.  मृतदेहाचे शवविच्छेदन शनिवारी सकाळी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

दोन रात्र...दोन खून...

गुरुवार आणि शुक्रवारच्या रात्री सलग दोन खुनाच्या घटना घडल्या असून, लातूर शहर आणि जिल्ह्यातील खुनाचे सत्र थांबता थांबत नसल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारच्या खुनाची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना ताजी असतानाच रात्री खुनाची दुसरी घटना घडली आहे. या दोन्ही घटनांनी लातूर हादरले आहे. 

पोलिस पथकाकडून त्या मारेकऱ्यांचा शोध...

पाणीपुरीवाल्या युवकाचा खून नेमका कोणत्या कारणांसाठी करण्यात आला आहे, याचा पोलिस शोध घेत आहेत. मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी पोलिस पथके मागावर आहेत. आरोपीच्या अटकेनंतरच खुनाच्या कारणांचा उलगडा होणार आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: Panipuri seller stabbed to death in Latur Second incident in 18 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.