नीट प्रकरणी लातुरात आणखी एकाला सीबीआयकडून अटक
By राजकुमार जोंधळे | Updated: July 9, 2024 08:20 IST2024-07-09T08:20:08+5:302024-07-09T08:20:15+5:30
लातूर येथे सीबीआयच्या पथकाने एकाला साेमवारी अटक केल्याची माहिती रात्री उशिरा समाेर आली.

नीट प्रकरणी लातुरात आणखी एकाला सीबीआयकडून अटक
लातूर : ‘नीट’मध्ये (नॅशनल एलिजीबिलीटी एन्टरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याप्रकरणी लातूर येथे सीबीआयच्या पथकाने एकाला साेमवारी अटक केल्याची माहिती रात्री उशिरा समाेर आली.
‘नीट’मध्ये गुणवाढीच्या संदर्भाने लातुरातील शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात २३ जून राेजी चाैघांविराेधात गुन्हा दाखल झाला हाेता. या गुन्ह्याच्या तपासासाठी गेल्या आठ दिवसांपासून सीबीआयचे पथक लातूर शहरात ठाण मांडून आहे. ‘नीट’मध्ये गुण वाढवून देताे, असे आमिष दाखवून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या एकाला सीबीआयने पुरावे मिळाल्यानंतर लातूरमधून अटक केली. नीट प्रकरणात आता लातूरमध्ये अटक केलेल्या आराेपीची संख्या तीन झाली आहे. तर दिल्लीच्या गंगाधारला आंध्र प्रदेशातून दाेन दिवसापूर्वीच अटक केली असून, ताे सध्या बंगळुरू येथे सीबीआय काेठडीत आहे.
याबाबत एका वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांची संपर्क साधला असता, यासंदर्भात आपल्याकडे कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.