गणेश विसर्जन मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणे; मंडळावर गुन्हे दाखल
By राजकुमार जोंधळे | Updated: September 27, 2023 14:35 IST2023-09-27T14:34:14+5:302023-09-27T14:35:08+5:30
उदगीर शहर पाेलिस ठाण्यात तक्रार

गणेश विसर्जन मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणे; मंडळावर गुन्हे दाखल
उदगीर (जि. लातूर) : शहरातील मंडळांकडून सातव्या दिवशी गणरायाला ढाेल-ताशांच्या गजरात निराेप देण्यात आला. साेमवारी काढण्यात आलेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आक्षेपार्ह गाणी वाजविल्याप्रकरणी उदगीर शहरातील दाेन गणेश मंडळांच्या चाैघांविराेधात उदगीर शहर पाेलिस ठाण्यात बुधवारी पहाटे गुन्हा दाखल केला आहे.
उदगीर शहरात लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणी वाजविण्यावर बंदी घातली हाेती. असे असतानाही उदगिरातील दोन गणेश मंडळांनी डीजे लावून, आक्षेपार्ह गाणी वाजवून आदेशाचे उल्लंघन केले. कलम १४४ प्रमाणे गाणे वाजविण्यावर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, याबाबत विविध गणेश मंडळांना लेखी नोटीसद्वारे कळविण्यात आले होते. तरीही उदगिरातील दाेन गणेश मंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. याबाबत उदगीर शहर पोलिस ठाण्यात पाेलिस नाईक राजीव सीताराम कट्टेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुरून उदगिरातील रोकडे हनुमान मंदिर गणेश मंडळ आणि भोई समाज गणेश मंडळाच्या चाैघांविराेधात बुधवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.