लातुरात सातत्याने भूगर्भातून गूढ आवाज; तीन दशकांत ११० भूकंपाचे धक्के, नागरिकांत धाकधूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 11:50 IST2025-09-01T11:45:34+5:302025-09-01T11:50:11+5:30
३० सप्टेंबर १९९३ रोजी किल्लारी येथे प्रलयकारी भूकंप झाला होता. त्यानंतर नेहमी भूगर्भातून आवाज येऊन जमिनीस हादरे बसत आहेत.

लातुरात सातत्याने भूगर्भातून गूढ आवाज; तीन दशकांत ११० भूकंपाचे धक्के, नागरिकांत धाकधूक
लातूर : शहरातील पूर्व भागात शनिवारी दुपारी १:४५ ते २ वाजण्याच्या दरम्यान भूगर्भातून मोठा गूढ आवाज येऊन जमीन हादरली. भूकंपाचा धक्का बसला की काय? अशा भीतीने नागरिक घराबाहेर पडले. मात्र, जिल्हा आपत्ती व्यवस्थानाने हा भूकंप नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, १९९३ मध्ये किल्लारीमध्ये झालेल्या विध्वंसक भूकंपापासून आजवर लातूर जिल्ह्यात ११० छोटे-मोठे भूकंपाच्या धक्क्यांची मालिकाच सुरू असल्याने नागरिकांत कायम धाकधूक असते.
लातुरातील पूर्व भागातील हत्तेनगर, सुभाष चौक, गंजगोलाई, श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, बाभळगाव नाका, विवेकानंद चौक, अंबाजोगाई रोड, गरुड चौक, व्यंकटेश नगर, अंबा हनुमान, तेली गल्ली, राम गल्ली, भीमाशंकर नगर या भागात शनिवारी दुपारी १:४५ ते २ वाजण्याच्या सुमारास अचानक भूगर्भातून मोठा आवाज आला आणि त्याचवेळी जमीन हादरल्याचे जाणवले. खिडक्यांच्या काचा जोरात वाजल्या. त्यामुळे भूकंपाच्या भीतीने काही नागरिक घराबाहेर पडले.
भूकंप नाही...
मोठा आवाज येऊन जमीन हादरली. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने भूकंपाची नोंद झाली नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये.
- साबेक उस्मानी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.
गणेशोत्सवात सतत आवाज...
३० सप्टेंबर १९९३ रोजी किल्लारी येथे प्रलयकारी भूकंप झाला होता. त्यानंतर नेहमी भूगर्भातून आवाज येऊन जमिनीस हादरे बसत आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत भूगर्भातील आवाज, जमीन हादरण्याच्या घटना वाढल्याचे गेल्या काही वर्षांच्यातील घटनांवरुन दिसून येते. शनिवारीच्या घटनेने पुन्हा त्या कटू आठवणी जागृत झाल्या.
तीन दशकामध्ये ११० भूकंपाचे धक्के...
१९९३ ते २०२५ या काळात भूकंपाच्या धक्क्यांनी शतक ओलांडले असून, ५०० किलाेमीटरच्या परिघात ११० धक्क्यांची नाेंद झाली. २००७ मध्ये सर्वाधिक १७ वेळा भूकंप झाला. यात लातूर-धाराशिव जिल्ह्याला सर्वाधिक ६० धक्के बसले. १९९९ मध्ये ११ धक्के, २००० मध्ये ५ धक्के, २००३ मध्ये ५ धक्के, २००४ मध्ये ७ धक्के, २००५ मध्ये १० धक्के, २००६ मध्ये ५ धक्के, २००८ मध्ये २ धक्के, २००९ मध्ये ७ धक्के, २०१० ते ११ मध्ये १२ धक्के, २०१२ ते २०१८ या कालावधीत १५ धक्क्यांची नाेंद आहे.
नांदेड, हिंगाेली जिल्ह्यालाही धक्के...
२००५ ते २०२५ या काळात नांदेड-हिंगाेली जिल्ह्यालाही भूकंपाचे धक्के बसले. २००७ मध्ये नांदेड शहर-जिल्ह्यात १० धक्के बसले. २०१६ आणि २०१७ मध्ये हिंगाेली जिल्ह्यात २ धक्के जाणवले. १९ ऑगस्ट २०२५ राेजी हासाेरी (ता. निलंगा) परिसरात सायंकाळी असेच धक्के जाणवले. मात्र, हा भूकंप नसल्याचे स्पष्टीकरण दिल्ली केंद्राने दिले आहे.