लातूरमध्ये अल्पवयीन बहीण-भावाचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 18:04 IST2019-02-12T17:54:09+5:302019-02-12T18:04:41+5:30
आष्टामोड येथून अल्पवयीन बहीण-भावाचे अपहरण करण्यात आल्याची घटना सोमवारी (11 फेब्रुवारी) घडली. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात मंगळवारी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूरमध्ये अल्पवयीन बहीण-भावाचे अपहरण
चाकूर (लातूर) : आष्टामोड येथून अल्पवयीन बहीण-भावाचे अपहरण करण्यात आल्याची घटना सोमवारी (11 फेब्रुवारी) घडली. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात मंगळवारी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील एक कुटुंब चाकूर तालुक्यातील आष्टामोड येथे साडीविक्रीच्या व्यवसायासाठी आले आहे. नेहमीप्रमाणे मल्लिकार्जुन बालस्ता आणि त्यांची पत्नी साडी विक्रीसाठी बाहेरगावी गेले होते. दरम्यान, इकडे घरासमोर खेळत असलेल्या भावाचा मुलगा (१२), मुलगी (८) यांचे अज्ञातांनी अपहरण केल्याची घटना घडली. घरी परतल्यानंतर त्यांना आपल्या भावाचा मुलगा आणि मुलगी गायब झाल्याचे दिसून आले. त्यांचा आष्टामोड परिसरात शोध घेतला असता, ते आढळून आले नाहीत.
याबाबत चुलते मल्लिकार्जुन दस्तगीर बालस्ता (रा. रानगरी गुट्टा ता. पुलवेंदला जि. कडप्पा, आंध्र प्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चाकूर पोलीस ठाण्यात मंगळवारी अज्ञाताविरोधात गुरनं. ३५/२०१९ कलम ३६३ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गिते हे करीत आहेत.