पहिल्याच आमदारकीत दुसऱ्यांदा मंत्री ! उदगीरचे आ. संजय बनसोडे यांना पुन्हा संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 17:10 IST2023-07-03T17:09:56+5:302023-07-03T17:10:32+5:30
पहिल्यांदाच आमदार, लगेचच राज्यमंत्री अन् नव्या बदलात कॅबिनेट मंत्री असा त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला आहे.

पहिल्याच आमदारकीत दुसऱ्यांदा मंत्री ! उदगीरचे आ. संजय बनसोडे यांना पुन्हा संधी
लातूर : उदगीर राखीव मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आलेले राष्ट्रवादीचे आ. संजय बनसोडे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळाली असून, ते दुसऱ्यांदा मंत्री झाले आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच आमदार, लगेचच राज्यमंत्री अन् नव्या बदलात कॅबिनेट मंत्री असा त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला आहे.
मंत्री संजय बनसोडे हे विद्यार्थीदशेपासून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे खंदे समर्थक राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते कार्यकर्ते आहेत. पक्षामध्ये प्रदेश सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. लातूर शहर जिल्हाध्यक्षही होते. उदगीर राखीव मतदारसंघात त्यांना २०१४मध्ये राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर एकही दिवस न थांबता ते पाच वर्षे मतदारसंघात जनतेच्या संपर्कात राहिले. २०१९ मध्ये निवडून आले. महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढावी, तरुणांना रोजगार मिळावा आणि विकासकामांची गती वाढावी, यासाठी नेते अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी झाल्याची प्रतिक्रिया मंत्री बनसोडे यांनी दिली.