औशात लोटस् ट्रॅव्हल्सला भीषण आग, ३० प्रवाशांचा जीव बचावला, नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 16:04 IST2025-08-15T16:03:25+5:302025-08-15T16:04:17+5:30
Latur News: स्वतंत्र्यदिनाच्या सकाळी पुण्याहुन औशात आलेल्या लोटस् ट्रॅव्हल्सच्या भीषण आगीचा थरार घडला.यात प्रवासी उतरण्यासाठी थांबलेल्या ट्रॅव्हल्सच्या पाठीमागील बाजूस अचानकपणे आग लागल्याने संपूर्ण खाजगी बस जळून खाक झाली.

औशात लोटस् ट्रॅव्हल्सला भीषण आग, ३० प्रवाशांचा जीव बचावला, नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
लातूर - स्वतंत्र्यदिनाच्या सकाळी पुण्याहुन औशात आलेल्या लोटस् ट्रॅव्हल्सच्या भीषण आगीचा थरार घडला.यात प्रवासी उतरण्यासाठी थांबलेल्या ट्रॅव्हल्सच्या पाठीमागील बाजूस अचानकपणे आग लागल्याने संपूर्ण खाजगी बस जळून खाक झाली. येथील नागरिक, तरुण, वेळीच मदतीला धावून आल्याने बसमधील ३० प्रवाशांचा जीव बचावला. या आगीत ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले असून काही मिनिटातच संपूर्ण ट्रॅव्हल्सच्या आतील व बाहेरील बाजूचा कोळसा झाली.सदरची आग पाठीमागील जोड टायर मधील मधले टायर फुटल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलीस निरीक्षक शिवशंकर मनाळे यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,दररोज रात्री एम एच १२ बीके ९७५२ ही क्रमांकाची ट्रॅव्हल्स किल्लारी ते पुणे प्रवास करते.नेहमीप्रमाणे रात्री पुण्याहून किल्लारीकडे जात असलेल्या ट्रॅव्हल्स मधील औशात प्रवासी उतरण्यासाठी हाश्मी चौकात थांबली असता प्रवासी उतरतच होते की इतक्यात पाठीमागील बाजूस अचानकपणे आगीचा भडगा उडाला.सदरची घटना रस्त्यावर घडल्याने आजूबाजूला असलेले तरुण,नागरिकांनी धाव घेत आतील प्रवासी खाली उतरवले.त्यानंतर अग्निशमन दलाच्या बंब घटनास्थळी वेळीच दाखल झिला,त्याच्यांच्या मदतीने संपूर्ण आग ५० मिनीटानंतर आटोक्यात आली.यावेळी ट्रॅव्हल्सच्या आतील बाजूचा कोळसा झाला होता तर काच,पत्राही जळाल्याने काही मिनीटाच संपूर्ण ट्रॅव्हल्सच जळून खाक झाली होती.या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूकीची कोंडी झाली होती.घटनास्थळी पोलिस निरीक्षक शिवशंकर मनाळे,मदार बोपले,नवनाथ चामे यांच्यासह पोलिसांच्या चमूने वाहतूक सुरळीत केली.
लोकांची तत्परता, प्रवाशांचा जीव बचावला
आज स्वातंत्र्य दिन असल्याने सर्वत्र लोकांची गर्दी होती.यातच जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झेंडावंदनासाठी पदाधिकारी कार्यकर्ते जमले होते.यावेळी डॉ. अफसर शेख यांच्यासह त्यांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, तरुणांनी मदतकार्य केल्याने प्रवासी सुखरूप बाहेर पडले.त्यासह ट्रॅव्हल्सची आग विझविण्यासाठी तत्परता दाखवली.
कपड्याच्या दुकानाला आग,लाखाचा माल भस्मसात
आज ट्रॅव्हल्सची आग विझवल्यानंतर काही वेळेतच सारोळा रोडवरील कापड्याच्या दुकानाला आग लागली. यात कपड्याचा माल जळून खाक झाला तर अग्निशमन दल बंब आल्याने तात्काळ आग आटोक्यात आली.येथेही लोकांनी मदतकार्य केल्याने न.प.कर्मचाऱ्याचे काम सहज झाले.या आगीत ८० हजाराचा माल जळून खाक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रत्येक जण व्हिडीओ काढण्यात दंग
ट्रॅव्हल्सला आग लागल्यानंतर काही जण मदतीसाठी सरसावले. तर बघ्याची एकच गर्दी केली होती. यात प्रत्येक जण हातात मोबाईल घेवून व्हिडिओ काढत होते.एवढेच नव्हे दुसऱ्या वाहनातील प्रवासी ही थांबून सेल्फी व व्हिडीओ काढण्यात दंग होते.