पत्नीवर वाईट नजर, अनेकदा समजावूनही त्रास देणाऱ्या सख्ख्या भावाला अखेर संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 17:54 IST2022-06-29T17:53:40+5:302022-06-29T17:54:21+5:30
भावास अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा त्रास सुरूच राहिला.

पत्नीवर वाईट नजर, अनेकदा समजावूनही त्रास देणाऱ्या सख्ख्या भावाला अखेर संपवले
उदगीर (जि. लातूर) : शहरालगत असलेल्या लोणी येथील एकाने पत्नीस वारंवार त्रास देत असल्याच्या कारणावरून काठी व विटाने डोक्यात मारहाण करत सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी सांगितले, मयत विकास ऊर्फ विकी बालाजी वाघमारे (रा. लोणी) व त्याचा भाऊ अविनाश बालाजी वाघमारे हे शेजारी राहत होते. मयत विकी हा नेहमीच आरोपीच्या पत्नीस वाईट नजरेने पाहत असे. याबाबत आरोपीने आपल्या भावास अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा त्रास सुरूच राहिला.
त्यामुळे हा राग मनात धरून मंगळवारी दुपारी आरोपीने सख्ख्या भावास लाकडाने व विटाने डोक्यात मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र नामदेव चिमोले यांच्या फिर्यादीवरून आरोपी अविनाश बालाजी वाघमारे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि तानाजी चेरले करीत आहेत.