लग्नासाठी दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्यास कारने उडविले; पती ठार, पत्नी गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 13:20 IST2025-03-13T13:20:46+5:302025-03-13T13:20:52+5:30
चाकूरनजीकच्या नांदगाव पाटीजवळील घटना; गत आठवड्यात याच ठिकाणी एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती.

लग्नासाठी दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्यास कारने उडविले; पती ठार, पत्नी गंभीर
चाकूर (जि. लातूर) : विवाह समारंभासाठी चाकूरकडे निघालेल्या एका जोडप्याच्या दुचाकीस भरधाव वेगातील कारने उडविले. त्यात मोटारसायकलवरील पती ठार झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी सकाळी ११:३० वा. च्या सुमारास तालुक्यातील नांदगाव पाटी येथे घडली.
विश्वनाथ केशव काटे (४५, रा. शिवणखेड बु.) असे मृताचे नाव आहे. तालुक्यातील शिवणखेड (बु.) येथून विश्वनाथ काटे व त्यांची पत्नी सुनंदा विश्वनाथ काटे (३९) हे बुधवारी सकाळी विवाह समारंभासाठी दुचाकी (एमएच. २४, आर. १८६२) वरून चाकूरकडे निघाले होते. ते रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील नांदगाव पाटी येथे पोहोचले होते. दरम्यान, अहमदपूरहून लातूरकडे बस जात होती. त्यापाठीमागे कार (एमएच. ४३, डी. ९०३५) होती. या बसने नांदगाव पाटीजवळील चौक पार केला. तेव्हा दुचाकीस्वाराने बस गेल्याचे पाहून आपली मोटारसायकल पुढे काढली असता कारने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती विश्वनाथ काटे हे ठार झाले तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. तसेच कारमधील चालक व अन्य एक व्यक्ती जखमी झाला.
जखमींना राष्ट्रीय महामार्गाच्या रुग्णवाहिकेतून लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच आरटीओ सुनील शिंदे, पोलिस शिरीष नागरगोजे, रितेश अंदूरकर, ज्ञानोबा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्याच्या मधोमध पडलेली दुचाकी बाजूस काढून वाहतूक सुरळीत केली. गत आठवड्यात याच ठिकाणी एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. त्यात ३६ जण जखमी झाले होते. त्यातील चौघांना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे नांदगाव पाटी हे ठिकाण ब्लॅकस्पॉट झाले आहे.