मराठा आरक्षणासाठी दोघांची आत्महत्या, चिठ्ठी लिहून संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 23:08 IST2018-08-03T23:07:29+5:302018-08-03T23:08:05+5:30
सततची नापिकी, आरक्षण व सवलती नसल्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी होणारा खर्च अन् कर्जाला कंटाळून औसा तालुक्यातील सेलू येथील नवनाथ निवृत्ती माने या तरूण शेतकऱ्याने शेतात गळफास घेतला.

मराठा आरक्षणासाठी दोघांची आत्महत्या, चिठ्ठी लिहून संपवले जीवन
औसा : सततची नापिकी, आरक्षण व सवलती नसल्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी होणारा खर्च अन् कर्जाला कंटाळून औसा तालुक्यातील सेलू येथील नवनाथ निवृत्ती माने या तरूण शेतकऱ्याने शेतात गळफास घेतला. तर तळणी येथील २२ वर्षीय सुमित सावळसुरे या तरूणानेही आरक्षणासाठी विष प्राशन केले.
सेलू येथील नवनाथ माने यांनी गळफास घेण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. मला तीन मुली व एक मुलगा असून, शिक्षणाचा मोठा खर्च आहे. आम्हाला आरक्षण व सवलती नाहीत, तसेच शेतात विहीर आहे, पाणी आहे पण ते उपसण्यासाठी मोटार घ्यावी तर पैसे नाहीत. या विवंचनेत मी माझे आयुष्य संपवत आहे, असे या चिठ्ठीत म्हटले आहे. सदर चिठ्ठी व कुटुंबियांच्या माहितीवरुन पोलिसांत नोंद झाली आहे.
युवकाची आत्महत्या
औसा तालुक्यातीलच तळणी येथील २२ वर्षीय सुमित विलास सावळसुरे या तरूणानेही दोन दिवसांपूर्वी विषारी द्रव प्राशन केले होते, त्यास उपचारासाठी लातूर येथील सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्याची प्राणज्योत मालवली. सुमितने बीएस्सी डीएमएलटी हा अभ्यासक्रम केला होता. तो नोकरीसाठी पुण्याला जावून आला. परंतु, त्याला रोजगार मिळाला नाही. याच विवंचनेत त्याने विषारी द्रव प्राशन केल्याचे त्याचे चुलते म्हणाले.
सुमितचा बळीही मराठा आरक्षणासाठी गेल्याने सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. सुमितला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, असा पवित्राही कार्यकर्त्यांनी घेतला होता. दरम्यान, औसा तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आरक्षणासाठी टाका येथील आठ युवकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.