लातूरमध्ये 'नानां'ना धक्का! अवघ्या २ मतांनी भावजयीचा पराभव करत नणंद आशाताई भिसे विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 15:30 IST2026-02-09T15:29:44+5:302026-02-09T15:30:50+5:30
माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांना स्वतःच्या घरातच धक्का! काँग्रेसच्या आशाताई भिसे विजयी

लातूरमध्ये 'नानां'ना धक्का! अवघ्या २ मतांनी भावजयीचा पराभव करत नणंद आशाताई भिसे विजयी
रेणापूर (लातूर): लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत लोकशाहीचा सर्वात थरारक आणि अटीतटीचा निकाल पाहायला मिळाला. एकाच कुटुंबातील नणंद-भावजय आमनेसामने असलेल्या या लढतीत काँग्रेसच्या आशाताई भिसे यांनी भाजपच्या सरिता भिसे यांचा अवघ्या ०२ मतांनी पराभव केला आहे. या निकालामुळे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांना त्यांच्या स्वतःच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे.
२ मतांचे 'महायुद्ध'
कामखेडा गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. एका बाजूला भाजपची ताकद आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, तर दुसऱ्या बाजूला आशाताई भिसे यांनी आपल्या सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव मैदानात उतरवला होता. मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही बाजूला श्वास रोखले गेले होते. अखेर जेव्हा निकाल जाहीर झाला, तेव्हा आशाताईंनी अवघ्या २ मतांची सरशी घेत विजयाचा गुलाल उधळला.
सामाजिक कार्याची पावती
महिला उद्योजिका आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या म्हणून आशाताई भिसे यांचा मोठा जनसंपर्क आहे. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीत त्या वर्षानुवर्षे सक्रिय आहेत. मतदारांनी त्यांच्या या दीर्घकालीन कार्यावर विश्वास दर्शवत त्यांना जिल्हा परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निकाल केवळ राजकीय विजय नसून, घरगुती नात्यांमधील राजकीय मतभेदांचा एक मोठा पेच ठरला आहे. त्र्यंबक नाना भिसेंच्या भाजप प्रवेशानंतरही आशाताईंनी काँग्रेसशी राखलेली निष्ठा अखेर फळाला आली आहे.
आतापर्यंतचा निकाल: लातूर जिल्हा परिषद विजयी : 59/54
(शशिकांत पाटील, लातूर)
भाजप : 18
काँग्रेस : 19
शिवसेना : 01
शिवसेना UBT: 01
NCP अजित पवार : 11
NCP शरद पवार : 01
वंचित : 00
मनसे : 01
अपक्ष : 02