कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:32 IST2025-07-28T18:31:57+5:302025-07-28T18:32:26+5:30
Latur Crime: लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील एका व्यक्तीने पत्नीला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली.

कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील एका व्यक्तीने पत्नीला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेत पीडित महिला ७० टक्के भाजली असून तिच्यावर लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित महिलेने आरोपीला त्याच्या मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याबद्दल जाब विचारला. मात्र, यामुळे आरोपीला राग अनावर झाला आणि त्याने पीडितेला ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले.
याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात पीडितेच्या पतीसह मैत्रीण, सासू आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. या अमानुष प्रकारामुळे सपूर्ण लातूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.
नेमके प्रकरण काय?
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, तिने आरोपीला त्याच्या मैत्रिणीला फिरायला घेऊन जाण्याबद्दल विचारणा केली. यावरून दोघांमध्ये मोठा वाद पेटला. यानंतर आरोपीने रागाच्या भरात पीडितेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. घटनेच्या वेळी पीडिताची सासू आणि दीर घरातच होते. त्यांनी पीडितेला वाचवण्याऐवजी घरातील दरवाजा बंद केला आणि बाहेरून कडी लावली.
पीडितेची प्रकृती चिंताजनक
या घटनेनंतर पीडिताला ताबडतोब लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेत पीडिताचे शरीर ७० टक्के भाजले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात पतीसह सासू, दीर आणि पतीच्या मैत्रिणीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.