बेशिस्त वाहतुकीचा बळी; रस्ता ओलांडणाऱ्या आजोबांना आधी दुचाकीची धडक, नंतर बसने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:12 IST2025-11-06T12:10:04+5:302025-11-06T12:12:31+5:30
लातुरात औसा राेडवर रस्ता ओलांडताना अपघात; बेशिस्त वाहतुकीचा बळी; रुग्णालयातील नातवाकडे जाणाऱ्या आजाेबाला बसने चिरडले

बेशिस्त वाहतुकीचा बळी; रस्ता ओलांडणाऱ्या आजोबांना आधी दुचाकीची धडक, नंतर बसने चिरडले
लातूर : शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या नातवाला पाहण्यासाठी जाणाऱ्या ६० वर्षीय आजाेबांना बसने चिरडल्याची घटना लातुरातील औसा राेडवर बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. रस्ता ओलांडताना हा अपघात घडल्याचे पाेलिसांनी सांगितले. सुनील गोविंदराव वतनेवकील (वय ६०, रा. अंबुलगा, जि. लातूर) असे ठार झालेल्या आजाेबांचे नाव आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यातील अंबुलगा (ता. निलंगा) येथील सुनील वतनेवकील यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. ते सध्या लातुरातील जुना औसा राेड परिसरातील श्री कालिकादेवी मंदिर परिसरात वास्तव्याला आहेत. त्यांचा नातू लातुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल आहे. त्याला पाहण्यासाठी सुनील वतनेवकील हे बुधवारी सकाळी घरातून बाहेर पडले. ते दुभाजकाची जाळी ओलांडून मेघमल्हार हाॅटेलसमाेर येत हाेते. दरम्यान, एका दुचाकी चालकाने त्यांना धडक देत पसार झाला. त्यावेळी लातूरकडून औशाकडे निघालेल्या शिवशाही बसच्या खाली आल्याने जागीच चिरडले जाऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताची माहिती शिवाजीनगर ठाण्याच्या पाेलिसांना मिळाली. पाेलिस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. पाेलिसांनी पंचनामा करून मृतदेह लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला. तेथील डाॅ. महेंद्र इंगळे यांनी दिलेल्या माहितीवरून शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात बुधवारी दुपारी अपघाताची नाेंद करण्यात आली आहे. तपास सहायक फाैजदार अशाेक चौगुले हे करीत आहेत.
लातुरात रस्ते अपघातांत वाढ
लातुरातील बेशिस्त वाहतुकीचा औसा राेडवर आणखी एक बळी गेला आहे. गत वर्षभरात बाभळगाव नाका, छत्रपती चाैक, नवीन रेणापूर नाका आणि गरुड चाैकात वाहनाने चिरडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जीवित हानी झाली आहे.
दुभाजक ओलांडताना दुचाकीने जाेराने उडवले
अंबुलगा येथील रहिवासी सुनील वतनेवकील हे लातूर शहरातील औसा राेडवर बुधवारी सकाळी दुभाजकाच्या जाळीतून रस्ता ओलांडत हाेते. दरम्यान, भरधाव असलेल्या दुचाकीने त्यांना जाेराने उडवले. यावेळी ते रस्त्यावर पडले. त्यातच औशाच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. शिवशाहीच्या चालकाला बसखाली आजाेबा आल्याचे लक्षात आले नाही, असे सहायक फाैजदार अशाेक चाैगुले म्हणाले.