लातूर : आरक्षण, सरकारी नोकरी व आर्थिक लाभाच्या उद्देशाने दोन मयतांच्या नावे सुसाईड नोट, तर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एका व्यक्तीच्या नावे लिहिलेली चिठ्ठी भलत्याच्याच अक्षरात निघाली. अखेर तपासात बिंग फुटले अन् तीन वेगवेगळ्या समाजातील प्रकरणांत पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
निलंगा तालुक्यातील दादगी येथे शिवाजी वाल्मीक मेळ्ळे (वय ३२) यांचा १३ सप्टेंबर २०२५ रोजी इलेक्ट्रिक शेगडीतून विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. त्यावेळी मरणोत्तर पंचनाम्यात पोलिसांना कोणतीही चिठ्ठी मिळाली नव्हती. तथापि, नंतर त्यांच्या घरात शर्टाच्या खिश्यातून एक चिठ्ठी मिळाली. ज्यामध्ये महादेव कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, असा उल्लेख होता. तसेच १४ सप्टेंबर रोजी अनिल बळीराम राठोड (२७, रा. हणमंतवाडी तांडा, ता. चाकूर) यांचाही घराचे बांधकामासाठी पाणी मारताना विद्युत पंपातून विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. तिथेही पंचनाम्यादरम्यान चिठ्ठी नव्हती. नंतर शिवाजी फत्तू जाधव याने पोलिसांकडे चिठ्ठी सादर करून ती मृत व्यक्तीने लिहिल्याचा दावा केला. त्यात बंजारा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आत्महत्या करीत असल्याचा मजकूर होता. २६ ऑगस्ट रोजी बळीराम श्रीपती मुळे (वय ३६, रा. शिंदगी ता. अहमदपूर) यांनी विषारी द्रव पिले. त्यांना उपचारासाठी लातूरच्या प्लॅनेट रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, एका नातेवाइकाने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सादर केली. ज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख होता.
प्रकरणाचा उलगडा कसा झाला?अहमदपूर, निलंगा आणि चाकूर ठाण्यांमध्ये दाखल तिन्ही प्रकरणांमध्ये मृत व्यक्ती तसेच आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे मूळ हस्ताक्षर आणि सादर झालेल्या चिठ्ठ्यांवरील हस्ताक्षर जुळले नाही. त्यानंतर चाकूर पोलिसांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये चिठ्ठी लिहिणारी संशयित व्यक्ती निष्पन्न झाली. याच पद्धतीने तीनही प्रकरणांतील संशयितांचे हस्ताक्षर नमुने तपासल्यानंतर शासकीय दस्तऐवज परीक्षण विभागाकडे पाठविण्यात आले. त्याच्या अहवालामध्ये हस्ताक्षर जुळत नसल्याचे निष्पन्न झाले.
कोणी लिहिल्या चिठ्ठ्या?यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी पत्रकारांना सांगितले, आत्महत्येचा प्रयत्न केलेला बळीराम मुळे यांची चिठ्ठी त्यांचा चुलत भाऊ संभाजी ऊर्फ धनाजी भिवाजी मुळे याने लिहिली. मयत शिवाजी मेळे प्रकरणातील चिठ्ठी माधव रामराव पिटले याने लिहिल्याचे समोर आले. तर अनिल राठोड प्रकरणातील चिठ्ठी शिवाजी फत्तू जाधव याने नरेंद्र विठ्ठल जक्कलवाड व तानाजी मधुकर जाधव यांच्याशी संगनमत करून नरेंद्र जक्कलवाड यांच्याकडून लिहून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि संबंधित पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी तिन्ही प्रकरणे संवेदनशीलपणे हाताळत बेकायदेशीर कृत्य समोर आणले आहे.
Web Summary : Three suicide notes, purportedly for reservation benefits, were discovered to be forged in Latur. Police investigations revealed discrepancies in handwriting, leading to charges against those who wrote the fake notes.
Web Summary : लातूर में आरक्षण लाभ के लिए कथित तौर पर लिखे गए तीन सुसाइड नोट फर्जी पाए गए। पुलिस जांच में लिखावट में विसंगतियां पाई गईं, जिसके कारण नकली नोट लिखने वालों के खिलाफ आरोप लगाए गए।