Latur: ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर-ट्रॉली कारवर कोसळली; समोर मृत्यू पाहिलेले चौघे बचावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 19:45 IST2025-12-09T19:45:15+5:302025-12-09T19:45:35+5:30
मुरुड शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

Latur: ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर-ट्रॉली कारवर कोसळली; समोर मृत्यू पाहिलेले चौघे बचावले!
मुरुड : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली अचानकपणे एका कारवर कोसळली. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कारमधील चौघे बालंबाल बचावले. ही घटना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक भागात सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नायगाव येथील एका शेतकऱ्याचा ऊस ट्वेंटी- ट्वेंटी साखर कारखान्यास ट्रॅक्टर (एमएच २४, एडब्ल्यू ५१४९) च्या ट्रॉलीतून मुरुडमार्गे सोमवारी नेण्यात येत होता. हा ट्रॅक्टर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आला. तेव्हा चालक ट्रॅक्टर वळवत असताना पाठीमागील ट्रॉली उभ्या असलेल्या असलेल्या कार (एमएच २४, बीआर ०५७७) वर अचानक कोसळली. ट्राली कोसळत असल्याचे पाहून कारमधील चालकाने प्रसंगावधान राखत वाहन पाठीमागे घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कारमधील चौघे बालंबाल बचावले. या घटनेत कारचे नुकसान झाले.
वाहतूक ठप्प...
या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. तेव्हा सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
खड्ड्यांमुळे अपघात...
मुरुड शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाला डॉ. आंबेडकर चौकातून सहजरीत्या वाहन वळवून राष्ट्रीय महामार्गावर घेऊन जाता येत नाही. परिणामी, सतत अपघात होत आहेत. तसेच वाहतूक कोंडीही होत असते. प्रशासनाने शहरातील खड्डे तत्काळ बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.