Latur: दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाची क्रूरता; आईची जमिनीवर डाेके आपटून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:15 IST2026-01-30T18:15:23+5:302026-01-30T18:15:57+5:30
Latur: घरातील अंगणातच रक्ताच्या थारोळ्यात वृद्ध मातेचा अंत झाला आहे.

Latur: दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाची क्रूरता; आईची जमिनीवर डाेके आपटून हत्या
उदगीर (जि. लातूर) : एका बाजुला ‘आई’ या शब्दाला परमेश्वराचे रूप मानले जाते, तर दुसऱ्या बाजुला नशेत बुडालेल्या पोटच्या गोळ्यानेच जन्मदात्या आईचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना उदगीर तालुक्यातील करखेली येथे साेमवारी सायंकाळी ते मंगळवारी सकाळी यादरम्यान घडली. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, या क्षुल्लक कारणावरून मुलाने स्वतःच्या ६५ वर्षीय वृद्ध आईचे केस धरून जमिनीवर डाेके आपटले. गंभीर जखमी आईचा जागीच मृत्यू झाला. याबाबत उदगीर ग्रामीण ठाण्यात बुधवारी सायंकाळी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, सैलानी बक्षुद्दीन मुंजेवार (वय ४५) याला दारूचे व्यसन जडले होते. सोमवार सायंकाळी ते मंगळवारी सकाळी आई यासीनबी बक्षुद्दीन मुंजेवार (वय ६५) यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिला. याच रागातून सैलानीने आईला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आराेपी मुलाने रागाच्या भरात आईच्या पोटात लाथा मारल्या आणि त्यानंतर तिचे केस धरून डोके जमिनीवर जोरात आपटले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या यासीनबीचा जागीच मृत्यू झाला.
घरातील अंगणातच रक्ताच्या थारोळ्यात वृद्ध मातेचा अंत झाला आहे. मयत महिलेच्या पार्थिवावर उदगीर रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक देवकत्ते हे तपास करत आहेत. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात वडील बक्षुद्दीन मोहदीनसाब मुंजेवार (वय ६९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलाच्या विरोधात बुधवारी सायंकाळी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.