विवाहित प्रेयसीच्या सांगण्यावरून केलं मोठं कांड; लातूर येथील हादरून टाकणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 22:55 IST2025-10-12T22:36:46+5:302025-10-12T22:55:33+5:30
लातूरमध्ये एका विवाहित महिलेच्या प्रियकराने तिच्याच पतीवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

विवाहित प्रेयसीच्या सांगण्यावरून केलं मोठं कांड; लातूर येथील हादरून टाकणारी घटना
लातूरमध्ये एका विवाहित महिलेच्या प्रियकराने तिच्याच पतीवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना लातुरातील म्हाडा कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिसांनी तत्परता दाखवत प्रियकर आणि पत्नी अशा दोघांनाही अटक केली असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी पती सचिन महादेव सूर्यवंशी (वय ४०, रा. म्हाडा कॉलनी) आणि त्याची पत्नी भक्ती (वय, ३०) हे महिनाभरापूर्वीच लातूरच्या म्हाडा कॉलनीत राहायला आले. आरोपी अविनाश किशोर सूर्यवंशी (वय २१, रा. वलांडी) याचे भक्तीशी गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. विशेष म्हणजे, अविनाश हा भक्तीपेक्षा नऊ वर्षांनी लहान असून, त्यांचे नातेसंबंधातील आहेत.
पती सचिनला या प्रेमसंबंधांबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यात वारंवार वाद व्हायचे. सचिन पत्नीला घराबाहेर जाताना घरात बंद करून जात असे, ज्यामुळे वैतागलेल्या भक्तीने प्रियकर अविनाशला पती 'छळ करतो' असे कारण सांगून हल्ला करण्यास प्रवृत्त केले. भक्तीच्या सांगण्यावरून प्रियकर अविनाशने सचिनला ठार मारण्याचा कट रचला. त्यासाठी अविनाश बी. फार्मसीचे शिक्षण सोडून मुंबईहून पोटदुखीचा बहाणा करून गावी परतला.
शुक्रवारी रात्री म्हाडा कॉलनीतील कमानीजवळ अविनाशने धारदार चाकूने सचिनच्या मानेवर, चेहऱ्यावर आणि छातीवर सपासप वार केले. या घटनेत सचिन गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करत पत्नी भक्ती आणि प्रियकर अविनाश सूर्यवंशी यांना अटक केली. चौकशीदरम्यान भक्ती अडखळत असल्याचे पाहून पोलिसांनी तिला विश्वासात घेतले असता, तिने अखेर प्रियकराचे नाव कबूल केले. या प्रकरणी दीपक दत्तू खेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक रेडेकर पुढील तपास करत आहेत.