Latur News: ११२ नंबरवरून पोलीस नियंत्रण कक्षात एक कॉल आला. कॉलवर एक तरुणी होती. ती म्हणाली साहेब मी आत्महत्या करायला आले आहे. तलावात अडकले आहे, मला वाचवा.' त्यानंतर तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात ही माहिती देण्यात आली आणि तरुणीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले. लातूर शहरात ही घटना घडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने तरुणीला नवे आयुष्य मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लातूर शहरात २४ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजता ही घटना घडली. साहेब मला वाचवा असे कॉल करून म्हणणाऱ्या तरुणीला वाचवण्यात पोलिसांना यश आले.
आत्महत्या करायला गेलेली तरूणी मूळची खरोसा येथील आहे. २१ वर्षीय तरुणीच्या वडिलांचे निधन झालेले असून, ती आईसोबतच राहायची. पुढील शिक्षणासाठी ती लातुरला आलेली आहे. काही कारणांमुळे तिला काही दिवसांपासून नैराश्याने ग्रासले होते.
नैराश्यातूनच तिने २४ सप्टेंबर रोजी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. औसा-लातूर महामार्गावर औशाजवळील कारंजे खडी केंद्राजवळ ती गेली. तेथील खदाणी पाण्याने भरलेल्या आहेत. यातील एका खदाणीत तिने उडी मारली. त्यानंतर तिच्या हाताला झाडाची फांदी लागली.
आत्महत्या न करण्याचा विचार आला अन्...
पाण्यात पडल्यानंतर तिचा आत्महत्येचा विचार बदलला. पुन्हा जगण्याची इच्छा तीव्र झाली आणि तिने मोबाईल काढून ११२ या क्रमांकावर कॉल केला. लातूरच्या पोलीस नियंत्रण कक्षात कॉल गेला. 'मी आत्महत्या करत आहे. एका तलावात पडले आहे. साहेब मला वाचवा.'
त्यानंतर पोलिसांनी मोबाईलवरून तिचे लोकेशन शोधले. लातूर ग्रामीण पोलिसांना याबद्दल कळवण्यात आले. औसा पोलीस ठाण्यात याची माहिती देण्यात आली. औसा पोलीस कारंजे खडी केंद्राजवळ गेले. तिथे शोधाशोध सुरू असतानाच पाण्याने भरलेल्या खाणीतून आवाज आला, 'मला वाचवा.'
त्यानंतर फौजदार अतुल डाके, पोलीस कर्मचारी सचिन मंदाडे, होमगार्ड उद्धव दळवे, नामदेव सोमंवशी आणि उमाकांत फावडे यांनी खाणीच्या दिशेने धाव घेतली. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पाण्यात उडी मारली. पाण्यात बुडत असलेल्या तरुणीला त्यांनी धरले आणि काठापर्यंत आणले.
त्यानंतर १५ मिनिटे तिला बाहेर काढण्याची धडपड सुरू होती. ओढणीचा आधार घेऊन तिला बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर तिचे समुदेशनही करण्यात आले.
Web Summary : A 21-year-old woman, struggling with depression, attempted suicide in Latur by jumping into a quarry. Regretting her decision, she called the police, who promptly rescued her. She is now safe.
Web Summary : अवसाद से जूझ रही 21 वर्षीय युवती ने लातूर में खदान में कूदकर आत्महत्या का प्रयास किया। निर्णय पर पछताते हुए, उसने पुलिस को फोन किया, जिसने तुरंत उसे बचा लिया। वह अब सुरक्षित है।