Latur: पंचनामे न झाल्याने संतापले सरपंच, तहसीलदारांच्या अंगावर फेकले पैशाचे बंडल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 16:07 IST2025-09-26T16:06:42+5:302025-09-26T16:07:29+5:30
‘सरकारला भीक लागली आहे, आम्ही ग्रामस्थांकडून वर्गणी जमा करून हे पैसे आणले आहेत’

Latur: पंचनामे न झाल्याने संतापले सरपंच, तहसीलदारांच्या अंगावर फेकले पैशाचे बंडल
निलंगा (जि. लातूर) : तालुक्यातील माकणी गावचे सरपंच राहुल माकणीकर यांनी तहसीलदारांवर पैसे फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंचनामे न केल्याच्या रागातून त्यांनी हे कृत्य केले. या घटनेनंतर सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केले असून, जोपर्यंत सरपंचाला अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
निलंगा तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात तीन ते चार फूट पाणी साचल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने आणि पीक नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. याच पार्श्वभूमीवर, माकणी गावचे सरपंच राहुल माकणीकर यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांना जाब विचारला. ‘सरकारला भीक लागली आहे, आम्ही ग्रामस्थांकडून वर्गणी जमा करून हे पैसे आणले आहेत,’ असे म्हणत त्यांनी १० आणि २० रुपयांच्या नोटांची बंडले तहसीलदारांच्या अंगावर फेकली. यातील अर्धे पैसे मुख्यमंत्र्यांनी आणि अर्धे पैसे महसूल विभागाने वाटून घ्यावेत, असेही ते म्हणाले.
सरपंचांचा पवित्रा आणि महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन
पैसे फेकल्यानंतर, ‘माझ्यावर गुन्हा दाखल करा, मला काहीच फरक पडत नाही,’ असे म्हणत सरपंच माकणीकर स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाले. या घटनेमुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मोर्चा काढला आणि निवेदन दिले. निवेदनात, जोपर्यंत राहुल माकणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत लेखणी बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर ५४ तलाठी, ५ नायब तहसीलदार, ९ मंडळ अधिकारी, १२ महसूल कर्मचारी, ४४ कोतवाल आणि ६ शिपाई यांच्या सह्या आहेत. विशेष म्हणजे, एखाद्या तहसीलदारावरच अन्याय झाला आणि त्यांनीच न्याय मागण्यासाठी मोर्चा काढण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.