वरात अन् लाठीचा प्रसाद देणारे अधिकारी मिळणार?
By राजकुमार जोंधळे | Updated: March 12, 2025 05:32 IST2025-03-12T05:29:52+5:302025-03-12T05:32:22+5:30
सहाही आमदारांची घरे लातुरात, कायदा-सुव्यवस्थेची चिंता मिटेल?

वरात अन् लाठीचा प्रसाद देणारे अधिकारी मिळणार?
लातूर : मंगळवारी सायंकाळी शहरात घडलेल्या मारहाणीच्या भयंकर प्रकाराने लातूरकरांच्या संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या. दुतर्फा गर्दी, रस्त्यावरून धावणारी वाहने असे दृश्य असताना मुख्य रस्त्याच्या मधोमध कपडे फाटेपर्यंत, जखमी युवकाला अर्धवस्त्र होईपर्यंत बेदम मारहाण झाली. त्यानंतर आरोपींना रस्त्यातून उचलून वरातीने ठाण्यात नेले, तोच काय दिलासा. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी लातूर शहरात अन् जिल्ह्यात आरोपींची वरात काढणारे आणि गरज पडल तिथे लाठीप्रसाद देणारे अधिकारी अलीकडे दिसत नाहीत.
लातूर जिल्ह्यात सहापैकी पाच आमदार सत्तेत आहेत. लातूर शहराचे आमदार विरोधी पक्षात आहेत. परंतु, जिल्ह्याचे राजकारण सकारात्मक आणि विकासासाठी एकाच मंचावर येणारे राहिले आहे. तोच विचार कृतीत आणून सर्वांनीच एकत्र येऊन गुन्हेगारांना वठणीवर आणणारे, प्रशासनाला गतिशील करणारे, तालुक्याला, उपविभागाला आणि मोठ्या शहरांना चांगले अधिकारी द्यावेत, अशी अपेक्षा व्यापारी, उद्योजक व्यक्त करीत आहेत. विरोधकांसह सत्तेतील सर्वांचेच लातूर शहरात लक्ष असते. कार्यक्रमांना, सोहळ्यांना हजेरी राहते. जिल्ह्यातील सर्वच आमदारांची घरे लातूर शहराभोवती आहेत. त्या सर्वांनाच कायदा, सुव्यवस्था सुरळीत हवी की नाही, हा कळीचा मुद्दा आहे.
शांत (!) लातुरात भरदिवसा अर्धवस्त्र होईपर्यंत मारहाण...
शांत (!) म्हटल्या जाणाऱ्या लातूर शहरात मंगळवारी धक्कादायक घटना घडली. कपडे फाटेपर्यंत अर्धवस्त्र करून रस्त्यावर बेदम मारहाण सुरू होती. मारहाण करणारे आणि मार खाणारा एकाच गटातील असो की कोणी, परंतु सार्वजनिक ठिकाणी कायदा, सुव्यवस्थेचे तीनतेरा पाहून अनेकांच्या संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या. काही काळ परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण होऊन प्रत्यक्ष घटनास्थळी गर्दी असूनही कोणीही समोर गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत नाही.
बरे केले, वरात काढली...
मंगळवारी भरदिवसा घडलेल्या घटनेतील आरोपींना तत्परतेने उचलून पोलिसांनी त्यांची रस्त्याने वरात काढत ठाण्यात नेल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले. त्यामुळे हाणामारीने धक्का बसलेल्या लातूरकरांना वरातीने दिलासा दिला. बरे केले, वरात काढली, अशी प्रतिक्रिया सामाजिक माध्यमात उमटली.
तरुण, तडफदार अधिकारी लातूरला मिळत नाहीत?
नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप कधीकाळी लातूरचे उपविभागीय अधिकारी होते. त्यांनी अनेकांना वठणीवर आणले. गुन्हेगारांवर वचक बसविला. अगदी अलीकडच्या काळात उपाधीक्षक सचिन सांगळे यांचेही काम दखलपात्र राहिले. अलीकडे मात्र तरुण अधिकारी चाकूर अन् तालुक्याच्या ठिकाणी पाठविले जातात. आताही आयपीएस अधिकारी चाकूरचे डीवायएसपी आहेत. मंत्रालयातून ही सूत्रे हलतात. तिथे जिल्ह्यातील सत्तेतील आमदार वजन खर्ची करून शहराला चांगले अधिकारी आणतील का, हा प्रश्न आहे.