Latur: गूढ आवाजाने निलंगा तालुक्यातील निटूर परिसर हादरला; भूकंपाची नोंद नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 16:00 IST2025-12-27T15:59:34+5:302025-12-27T16:00:02+5:30
निलंगा तालुक्यातील निटूरसह कलांडी, डांगेवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी १२.३५ ते १२.४५ वा. च्या सुमारास अचानक भूगर्भातून गूढ आवाज आला.

Latur: गूढ आवाजाने निलंगा तालुक्यातील निटूर परिसर हादरला; भूकंपाची नोंद नाही
निटूर (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील निटूरसह परिसर शुक्रवारी दुपारी १२.३५ ते १२.४५ वा. च्या सुमारास गूढ आवाजाने हादरले. भूकंप झाल्याच्या भीतीने नागरिकांनी क्षणात घराबाहेर धाव घेतली. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने भूकंपाची कुठलाही नोंद झाली नसल्याचे स्पष्ट केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
निलंगा तालुक्यातील निटूरसह कलांडी, डांगेवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी १२.३५ ते १२.४५ वा. च्या सुमारास अचानक भूगर्भातून गूढ आवाज आला. त्यामुळे भूकंपाच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले आणि भूकंपाची चर्चा करु लागले. काहींनी घरातील रॅकवरील भांडी ही हलल्याचे सांगितले. त्यामुळे भीती आणखी वाढली. दरम्यान, या घटनेची माहिती माजी पंचायत समिती सदस्य सुरेंद्र धुमाळ, कोतवाल सतीश बसवणे व ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांना माहिती दिली.
जिल्हा प्रशासनाने त्वरित नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडे तपासणीसाठी माहिती पाठविली. तेव्हा नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झाली नसल्याचे कळविले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
अफवांवर विश्वास ठेवू नये...
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने केले आहे.