Latur: पैशांच्या वादातून मित्रानेच केली हत्या, अखेर दोघांना जन्मठेप; १६ साक्षीदार महत्वाचे ठरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 12:55 IST2025-09-13T12:54:23+5:302025-09-13T12:55:20+5:30
तुम्ही कोणावर विश्वास ठेवताय? पैशांच्या वादातून मित्रानेच एका तरुणाचा जीव घेतला.

Latur: पैशांच्या वादातून मित्रानेच केली हत्या, अखेर दोघांना जन्मठेप; १६ साक्षीदार महत्वाचे ठरले
उदगीर (जि. लातूर) : हातउसन्या २५ हजारांच्या पैशावरून एकाचा खून करणाऱ्या दाेघा आरोपींना उदगीर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. बी. गमे यांनी शुक्रवारी सायंकाळी कलम ३०२ भादंविनुसार सक्तमजुरीसह जन्मठेप व प्रत्येकी दहा हजारांचा दंड अशी शिक्षा ठाेठावली आहे.
आरोपी साईनाथ गोपीनाथ इंगेवाड (वय २३, रा. डोंगर शेळकी, ता. उदगीर) आणि सागर संतोष डोंगरे (२३, रा. इंदिरानगर उदगीर) यांनी १९ जून २०१८ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून (एम.एच.१२ डी.यू. ६०७०) आशिष ज्ञानोबा केंद्रे (वय २५) यांच्या घरानजीक गेले. वडिलांसमोर आशिष यांना फोन करून घरातून बोलावून घेतले. आशिष यांनी साईनाथ इंगेवाड याला २५ हजार रुपये हातउसने दिले होते. दरम्यान, या पैशासाठी सतत तगादा लावत असल्याच्या रागातून आशिष केंद्रे याच्या छातीवर, पोटावर चाकूने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला.
१६ साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली
यावेळी आशिषने वाचवा...वाचवा म्हणून जोरजाेराने ओरडल्याने घरातील वडील, आई आणि पत्नीने घटनास्थळी धाव घेतली. शिवाय, शेजारचे धीरज तांडले हेही धावून आले. आरोपींच्या तावडीतून आशिषला साेडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी साईनाथ याने धीरजच्या हातावर चाकूने वार केले. यात धीरज हेही जखमी झाले. त्यानंतर दाेघा आराेपींनी पळ काढला, अशी तक्रार मयताचे वडील ज्ञानोबा केंद्रे (रा. नावंदी ता. उदगीर) यांनी उदगीर शहर पोलिस ठाण्यात दिली. याबाबत दाेघांविराेधात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास पोनि. सुधीर सूर्यवंशी यांनी केला. न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. एकूण १६ साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सहायक सरकारी वकील गौसपाशा सय्यद यांनी युक्तिवाद केला.
जन्मठेप व दंड अशी शिक्षा
सुनावणीअंती न्यायाधीश वाय. बी. गमे यांनी शुक्रवारी सायंकाळी दोन्ही आरोपींना सक्तमजुरीसह जन्मठेप व प्रत्येकी १० हजारांचा दंड अशी शिक्षा ठाेठावली. या खटल्यामध्ये ॲड. शिवकुमार गिरवलकर, ॲड. एस. आय. बिरादार, ॲड. विनायक केंद्रे यांनी सहकार्य केले. पाेकाँ. तानाजी बंडे यांनी पैरवी केली.