लातूर मनपा रणधुमाळी; काँग्रेस, भाजप इच्छुकांच्या मुलाखती झाल्या, उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 19:00 IST2025-12-19T18:59:48+5:302025-12-19T19:00:02+5:30
बंडखोरीही टळावी, विजयाचे निकष धरून चांगले उमेदवार मैदानात उतरविण्यासाठी नेत्यांचा कस पणाला लागणार आहे.

लातूर मनपा रणधुमाळी; काँग्रेस, भाजप इच्छुकांच्या मुलाखती झाल्या, उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु!
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चितीसाठी चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेस व भाजपने १५ दिवसांपूर्वीच प्रभागनिहाय इच्छुकांचे अर्ज घेतले. भाजपने तर दोन दिवसांपूर्वीच मुलाखतीही उरकल्या. बुधवार व गुरुवार दोन दिवस काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. ज्यांनी मुलाखती दिल्या, त्यांच्यापैकीच एखाद्याला तिकीट मिळेल की ऐनवेळी मुलाखत न देताही वर्णी लागेल, याची चर्चा हाेत असून, जाेरदार रस्सीखेच सुरु आहे.
मनपाच्या ७० जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत पुढील चार दिवसांत उमेदवार निश्चित करणे सर्वच प्रमुख पक्षांसमोर आव्हान आहे. बंडखोरीही टळावी, विजयाचे निकष धरून चांगले उमेदवार मैदानात उतरविण्यासाठी नेत्यांचा कस पणाला लागणार आहे. निवडणुकीपूर्वीच लातूर शहरात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची पक्षांतरेही वाढली आहेत. कोण कुठल्या पक्षात जाणार, तिकीट मिळाले तर, नाही मिळाले तर अशी जर-तरची गणिते मांडून उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदारांच्या भेटीबरोबर नेत्यांशी संपर्क वाढविण्यात इच्छुकांचा दिवस जात आहे.
काँग्रेस, भाजपकडे ओढा...
इच्छुक उमेदवारांची संख्या भाजप व काँग्रेसकडे सर्वाधिक आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी, आप, एमआयएमसह इतर पक्षांचीही तयारी दिसून येत आहे. सर्वांनीच उमेदवार निश्चितीसाठी बैठकांचा जोर वाढविला आहे. बुधवारी दिवसभर काँग्रेस भवनसमोर कार्यकर्त्यांची गर्दी होती. जवळपास ५० टक्के इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. उर्वरित मुलाखती गुरुवारी होणार असल्याचे सांगण्यात आले.
अर्ज दिला, छाननी झाली, नाव कोणाचे?
महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ आहे. एका-एका प्रभागात एका जागेसाठी पाच ते दहा जणांनी दावा केला आहे. त्यामुळे नेत्यांना उमेदवार देत असताना कसरत करावी लागत आहे. ज्यांनी पक्षाकडे रितसर शुल्क भरून अर्ज दिला, ज्यांनी मुलाखत दिली, त्यांनाच उमेदवारी देताना प्राधान्य दिले जाईल की, ऐनवेळी कोणी तरी वजनदार म्हणून ‘चर्चित चेहरा’ म्हणून तिकीट घेऊन जाईल की काय, अशी भीतीही उमेदवारांना आहे.